Loksabha 2019: उमेदवाराची चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांना फुटला घाम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

दिव्यांग असलेल्या किशोर राजाराम पन्हाळकर यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करताना भराव्या लागणाऱ्या २५ हजार रुपयांपैकी १७ हजार रुपयांची चिल्लर देऊन अनामत रक्कम मोजणाऱ्या अधिकाऱ्यांना घाम फोडला.

कोल्हापूर - कोण विकासाचे मुद्दे, कोण शेतकऱ्यांचे प्रश्‍न, तर कोण संपूर्ण देशाचा विचार करून कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. एकमेकांवर टीका करून स्वत:कडे लक्ष वेधत आहेत, तर दुसरीकडे दिव्यांग असलेल्या किशोर राजाराम पन्हाळकर यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करताना भराव्या लागणाऱ्या २५ हजार रुपयांपैकी १७ हजार रुपयांची चिल्लर देऊन अनामत रक्कम मोजणाऱ्या अधिकाऱ्यांना घाम फोडला. ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या मराठी चित्रपटातील उमेदवाराप्रमाणेच अनामत भरण्यासाठी आणलेल्या चिल्लरची दिवसभर चर्चा होती. 

पेठवडगाव येथील पन्हाळकर यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आपल्या चार मित्रांसह श्री. पन्हाळकर अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्या कार्यालयात हजर झाले. हातात वजनदार पिशवी घेऊन कार्यालयात जाणाऱ्या कार्यकर्त्याला दरवाजात थांबवून विचारणा केली. यामध्ये अनामत रक्कम भरण्यासाठी आणलेले पैसे असल्याचे सांगण्यात आले. दुपारी पावणेतीनच्या सुमारास अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. काही वेळानंतर रक्कम मोजण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चारपर्यंत ही रक्‍कम मोजून पूर्ण झाली. त्यानंतर अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली. शेतकरी, कामगार, दिव्यांगांच्या प्रश्‍नासाठी निवडणूक लढविणार असल्याचे श्री. पन्हाळकर यांनी सांगितले.  

२, ५ आणि १० रुपयांची नाणी
श्री. पन्हाळकर यांनी २५ हजार रुपयांपैकी १७ हजार रुपयांची २, ५ आणि १० ची नाणी आणली होती; तर उर्वरित रकमेत १०, २०, ५० व १०० रुपयांच्या नोटा आणल्या होत्या. या नाण्यांचा आणि नोटांचा ताळमेळ घालताना ७ ते ८ अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला.

Web Title: Loksabha 2019 Hatkanangale Lok Sabha Constituency