Loksabha 2019 : हवामानाप्रमाणे उद्धव ठाकरे बदलतात : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

कोल्हापूर - महाराष्ट्रात एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला किंवा त्यांनी केलेल्या विधानात एक सातत्य असायचे. परंतु, ज्यांच्याकडे नेतृत्व आहे, ते हवामान बदलेल तशी त्यांची धोरणेही बदलतात, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

कोल्हापूर - महाराष्ट्रात एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला किंवा त्यांनी केलेल्या विधानात एक सातत्य असायचे. परंतु, ज्यांच्याकडे नेतृत्व आहे, ते हवामान बदलेल तशी त्यांची धोरणेही बदलतात, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

श्री. पवार म्हणाले, ‘पंढरपूरच्या सभेत त्यांनी भाषण केले, की युती गेली खड्ड्यात. आता हे खड्ड्यातून वर कसे आले? गळ्यात गळे कसे घालायला लागले? अफझलखानाला मिठ्ठी कशी मारू लागले आणि तेच आता आमच्यावर टीका करत आहेत. जे बोलतो त्यात बाळासाहेब ठाकरे असताना सातत्य होते, ते आता यत्किचिंतही राहिलेले नाही. सोयीप्रमाणे विधाने करायची, इतरांवर टीकाटिप्पणी करायची आणि काहीतरी गोष्टी सांगत बसायच्या. त्यांनी सांगितले शरद पवार संरक्षण मंत्री असताना जमीन विकायला निघाले. आता मी मंत्री होऊन ३२ वर्षे झाली, एक तर जमीन विकल्याची बातमी तुम्ही बघितली का?’

आमचेच नव्हे तर काँग्रेसचेच लोक फोडले आहेत. प्रत्येक निवडणुकीत पश्‍चिम महाराष्ट्र हेच केंद्र असते. गेल्या दोन-तीन निवडणुकीत ते दिसले आहे. सर्वांचे लक्ष इकडेच असते. त्यातही माढा, सांगली, बारामती, कोल्हापूर इथेच ते लक्ष घालतात, कारण त्यांचे आमच्यावर प्रेम आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाच्या कायद्याचा जो गैरवापर केला जातो, तो थांबवण्याची तरतूद करण्याचा उल्लेख त्यात आहे, असे श्री. पवार यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.  

राज ठाकरेंचा एककलमी कार्यक्रम 
राज ठाकरे यांचा एककलमी कार्यक्रम म्हणजे, मोदी, शहा ही जोडगोळी देशाला घातक आहे हे सांगणे. आणि ते हे पटवून देत आहेत. त्यांच्यावर काही बंधन नाही. त्यांनी उमेदवार उभे केलेले नाहीत. त्यांना निवडणुकीचा खर्च सादर करावा लागत नाही. त्यामुळे सरकारही त्यांना काही करू शकत नाही. स्वतः ठाकरे जे चुकीचे चालले आहे, ते सउदाहरण मांडतात. मोदी पूर्वी काय बोलले आणि आता काय बोलत आहेत, याचा व्हिडिओ ते दाखवत आहेत आणि ते प्रभावी होत आहे. त्या त्या ठिकाणच्या उमेदवारांना त्याचा फायदा होईल हे सांगतानाच, राज्यातही युतीला रोखण्यासाठी ज्यांना ज्यांना बरोबर घेतले जाईल, त्यात मनसेचीही चर्चा होऊ शकते, असे सुचक वक्‍तव्य त्यांनी केले.

Web Title: Loksabha 2019 Sharad Pawar comment on Uddhav Thackeray in Kolhapur