Loksabha 2019 :विजयासाठी करावी लागणार कसरत

Loksabha 2019 :विजयासाठी करावी लागणार कसरत

राज्यातील महायुतीच्या प्रचाराचे कोल्हापुरात रणशिंग फुंकले गेले. या सभेसाठी शिलेदारांनी गर्दीही मोठी केली. महायुतीने या सभेच्या माध्यमातून केलेल्या शक्तिप्रदर्शनाची झलक पाहावयास मिळाली. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनाही रिचार्ज करण्याचे काम या सभेमुळे झाले. जमलेली गर्दी मतांमध्ये बदलण्यासाठी आता खरी व्यूहरचना भाजप-शिवसेनेसह मित्रपक्षांना करावी लागणार आहे. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आता आपली ताकद दाखविण्यासाठी कसरत करावी लागेल. 

महायुतीच्या सभेसाठी पश्‍चिम महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातून कार्यकर्ते आले होते. पहिल्याच मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दमदार भाषणे ठोकली. या दोघांनीही आपल्या भाषणांमध्ये विविध विषयांचा ऊहापोह केला असला तरी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी देशाच्या राजकारणाशी संबंधित विषयांना अधिक महत्त्व दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रस्थानी ठेवून भाषण केले, तर श्री. ठाकरे यांनी राज्यपातळीवरील आपले विषय ठेवून भाषण केले. हिंदुत्व हा दोघांच्या भाषणातील समान धागा होता. हिंदुत्व हाच अजेंडा ठेवून आता प्रचाराची रणनीतीही आखली जाईल, याचे संकेतही त्यांनी भाषणात दिले. 

पश्‍चिम महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने या बालेकिल्ल्यातून त्यांनी सुरू केलेल्या या प्रचारामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही विचार करण्याची वेळ आली आहे. कार्यकर्त्यांना ‘रिचार्ज’ करण्याचे काम महायुतीने केले; पण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्याचे आव्हान या नेत्यांसमोर असणार आहे आणि नेमका हाच फायदा घेण्यासाठी महायुती प्रयत्न करेल. राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या सभेसाठी केलेली तयारी निश्‍चितच विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारी आहे. या सगळ्या शक्तीचे मतांत रूपांतर करण्याचे आव्हान महायुतीतील नेत्यांना पेलावे लागेल. भाजपला शिवसेनेच्या उमेदवारासाठी आपली ‘खरी’ शक्ती उभी करावी लागणार आहे. 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांचे चुलत भाऊ भाजपचे आमदार अमल महाडिक हे कात्रीतच सापडले आहेत. एकीकडे युतीधर्म, तर दुसरीकडे कुटुंब अशा अवस्थेत ते आहेत. त्यामुळे ते युतीचा प्रचार कितपत ताकदीने करतील, हा प्रश्‍न आहे. ते ‘अलिप्त’ राहिले तरी अडचण आहे. विनय कोरे महायुतीत येणार म्हणत होते; परंतु ते सभेला आले नाहीत. त्यामुळे हातकणंगलेत ते शिवसेनेच्या उमेदवाराला कितपत मदत करतील, हा प्रश्‍न आहे. एकूणच, महायुतीला आपल्या कार्यकर्त्यांना मतदानापर्यंत आपला युतीधर्म पाळण्यासाठीचे बंधन घालावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com