Loksabha 2019 : पक्षांतराने काँग्रेसचा विचार संपणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात बरीच स्थित्यंतरे झाली. काहींनी पक्षांतर केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होती. परंतु, काँग्रेस पक्ष ही केवळ संघटना नसून तो एक विचार आहे. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते गेले नाहीत. कोणा व्यक्तीमुळे पक्ष मोठा होत नाही, तर पक्षामुळे व्यक्ती मोठी होत असते. त्यामुळे कोणीही पक्ष सोडून गेले तरी काँग्रेसचा विचार संपणार नाही, अशी उपरोधिक टीका माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नावाचा उल्लेख टाळून माजी आमदार मदन भोसले यांच्यावर केली.

वाई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात बरीच स्थित्यंतरे झाली. काहींनी पक्षांतर केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होती. परंतु, काँग्रेस पक्ष ही केवळ संघटना नसून तो एक विचार आहे. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते गेले नाहीत. कोणा व्यक्तीमुळे पक्ष मोठा होत नाही, तर पक्षामुळे व्यक्ती मोठी होत असते. त्यामुळे कोणीही पक्ष सोडून गेले तरी काँग्रेसचा विचार संपणार नाही, अशी उपरोधिक टीका माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नावाचा उल्लेख टाळून माजी आमदार मदन भोसले यांच्यावर केली.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ येथील साठे मंगल कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, सुनील काटकर, जिल्हा युवक अध्यक्ष विराज शिंदे, प्रदेश युवकचे सरचिटणीस जयदीप शिंदे, विकास शिंदे, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा धनश्री महाडिक, तालुकाध्यक्षा अल्पना यादव, खंडाळ्याच्या उपसभापती वदंना धायगुडे, चंद्रकांत ढमाळ, गुरुदेव बरदाडे, एस. वाय. पवार, माजी सभापती सुनीता शिंदे, विजय भिलारे, विलास पिसाळ, प्रतापसिंह राजेभोसले, माणिक पवार, हिंदुराव पाडळे, रशीद बागवान, हणमंत पिसाळ, विवेक मेरूकर, सलीम बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार भोसले म्हणाले, ‘‘मागील निवडणुकीत हायटेक प्रचार करून खोटी आश्वासने, दिशाभूल करून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने सत्तेचे केंद्रीकरण करून हुकूमशाही सुरू केली. त्यामुळे पुन्हा लोकशाही प्रस्थापित करून देशाला प्रगती व विकासाच्या दिशेला नेण्यासाठी जनतेने राज्यघटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करून परिवर्तन घडवून आणावे.’’

विराज शिंदे म्हणाले, ‘‘आपण काँग्रेस पक्ष कधीही सोडणार नाही. निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. ज्येष्ठ नेत्यांनी प्रत्येक गाव आणि वाडीवस्तीवरील काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद देऊन पुन्हा पक्षाला नवसंजीवनी प्राप्त करून द्यावी.’’ विकास शिंदे म्हणाले, ‘‘टोलनाका महाराजांचा नाही तर रिलायन्स कंपनीचा आहे. त्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे काम महाराजांनी केले.’’ या वेळी जयदीप शिंदे, ॲड. प्रतापसिंह देशमुख, अल्पना यादव, मंजिरी पानसे, मदन ननावरे, मुन्नाभाई वारुणकर, संतोष पिसाळ, विक्रम वाघ, रवी भिलारे, मानसिंगराव चव्हाण आदींची भाषणे झाली. 

प्रदीप जायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. खासदार उदयनराजे भोसले यांच्या विकास वाटचालीबाबत पथनाट्य सादर करण्यात आले. मराठा महासंघ, सातारा जिल्हा बॅंड संघटना, गोसावी समाज संघटना यांनी खासदार उदयनराजे यांना पाठिंबा जाहीर केला. मेळाव्यास वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्‍यांतील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Congress Prithviraj Chavan Politics