Loksabha 2019 : ‘कमळा’च्या विरोधात ‘सी-व्हिजिल’ मोहीम

CVIGIL
CVIGIL

सातारा - लोकसभा निवडणुकीतील आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्या सोडवणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदारांना सिटिझन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे जीपीएस प्रणालीयुक्त मोबाइल ॲप्लिकेशन उपलब्ध केले आहे. जिल्ह्यातील १५ पैकी पाच तक्रारींत तथ्य आढळल्यानंतर त्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्हाभरात अनेक ठिकाणी भाजपने प्रचारासाठी ‘कमळा’ची छायाचित्रे काढली होती. त्याविरोधात दोन तक्रारी या ॲपवर दाखल झाल्या. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सी-व्हिजिल हे जीपीएस प्रणालीवर आधारित मोबाइल ॲप्लिकेशन मतदारांना उपलब्ध झाले आहे. आचारसंहितेसोबत सुरू झालेल्या मोबाइल ॲप्लिकेशनवर ज्या तक्रारी येणार आहेत, त्यांची खातरजमा करून १०० मिनिटांत त्यावर कारवाईच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. परिणामी तक्रार येताच तहसीलदार, तीन पोलिस, लिपिक, जाबजबाब घेणाऱ्या यंत्रणेसह सगळा भरारी पथकाचा लवाजमा घटनास्थळी पोचतो. मात्र, तेथे गेल्यावर तक्रार नसून, केवळ खातरजमा करण्यासाठी केलेली गंमत असल्याचेही समोर येत आहे. 

सी-व्हिजिल ॲपवर आतापर्यंत जिल्ह्यातून १५ तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये येथील बांधकाम भवनातील राजकीय नेत्यांची नावे असलेले फलक न झाकलेला, डाक कार्यालयातील योजनांचे फलक न झाकलेले, सातारा नगरपालिकेत सभांचे इतिवृत्तांत लिहिण्याचे काम सुरू असलेले काम, पिंपोडे (ता. कोरेगाव), शेरे (ता. कऱ्हाड) येथे खासगी घरांवर कमळाचे चिन्ह असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या पाच तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र, एका युवकाने हॉटेलमध्ये मद्य दिले जात असल्याचे दाखविण्यासाठी चक्‍क सेल्फी काढून पाठविला आहे. एकाने तर चक्‍क मतदानादिवशी काय होऊ शकते, याची भविष्यवाणी केली आहे. याशिवाय, भरारी पथकांचे प्रशिक्षण घेण्यासाठी तक्रारी करण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाने मतदारांच्या हक्कासाठी, निवडणुकीत पारदर्शकता येण्यासठी हे ॲप सुरू केले आहे. त्याचा उद्देश लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्कतेने तक्रारी कराव्यात.
- देविदास ताम्हाणे, नोडल अधिकारी, सी-व्हिजिल ॲप.

प्रशासनाची दमछाक
या ॲपवर तक्रारीऐवजी काही ठिकाणी मोबाइल ॲपवर स्वतःचाच सेल्फी पाठवून, जाणीवपूर्वक अथवा अपुऱ्या माहितीवरून तक्रार करून प्रशासनाची चेष्टा केली जात आहे. ऑनलाइन तक्रारीची पुढील १०० मिनिटांत सोडवणूक करायची असल्याने प्रशासनाला मात्र पोलिस, महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सगळा लवाजमा घेऊन जावे लागत असल्याने या पथकाची दमछाक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com