Loksabha 2019 : साखर कारखानदारांचा कौल कुणाला ?

 Loksabha 2019 : साखर कारखानदारांचा कौल कुणाला ?

जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत, यापैकी दोन कारखाने बंद आहेत. उर्वरित २१ कारखान्यांपैकी ८ कारखान्यांवर राष्ट्रवादी किंवा काँग्रेसची सत्ता आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील दोन कारखान्यांवर शिवसेनेची तर दोन कारखान्यांवर भाजपची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीत साखरपट्टा म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांचा कौल कुणाच्या बाजूने असेल, याविषयी उत्सुकता आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यातील साखर कारखानदारी चांगल्या पद्धतीने सुरू आहे. कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात त्या त्या कारखान्यांच्या सत्ताधारी मंडळींचा दबदबा आहे. लोकसभा निवडणुकीत हा दबदबा किती कामाला येणार याविषयी उत्सुकता आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तब्बल १२ साखर कारखाने आहेत. यापैकी ‘दौलत’ व ‘इंदिरा-तांबाळे’ हे दोन कारखाने बंद आहेत.

उर्वरित दहा कारखान्यांपैकी बिद्री, भोगावती, गडहिंग्लज, डी. वाय. पाटील व सरसेनापती कारखान्यांवर कुठे राष्ट्रवादीची तर कुठे काँग्रेसची सत्ता आहे. याच मतदारसंघातील राजाराम साखर कारखान्यावर माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे. सध्या ते कोणत्याही पक्षात नसले तरी कारखान्याची यंत्रणा मात्र त्यांचे पुतणे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारात सक्रिय आहे. 

‘भोगावती’वर माजी आमदार पी. एन. पाटील यांची सत्ता आहे. पक्षादेश त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, त्यानुसार त्यांचीही ताकद राष्ट्रवादीच्या उमेदवारामागे लागेल. गडहिंग्लज आणि सरसेनापती हे दोन्ही कारखाने राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने त्यांनाही ही ताकद राष्ट्रवादीच्या मागेच उभी करावी लागेल. ‘बिद्री-कागल’वर राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांची सत्ता आहे. या सत्तेचा वापरही ते राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठीच करतील अशी शक्‍यता आहे.

‘शाहू-कागल’वर ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे वर्चस्व आहे. ते भाजपत असल्याने त्यांची रसद सेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनाच मिळणार आहे. आजरा कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांनी भाजपत प्रवेश केला असला तरी जिल्ह्याच्या राजकारणात ते महाडिक यांच्यासोबत आहेत. कारखान्याच्या पातळीवरही त्यांचा हाच निर्णय असेल. ‘कुंभी’वर शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांची तर ‘डी. वाय.’ कारखान्यावर आमदार सतेज पाटील यांची सत्ता आहे.

या दोघांनीही यापूर्वीच प्रा. मंडलिक यांच्या प्रचारात उडी घेतली आहे. ‘मंडलिक-हमीदवाडा’चे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक हेच शिवसेनेचे उमेदवार असल्याने ते ही ताकद आपल्यामागेच उभी करतील. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार राजू शेट्टी विरुद्ध साखर कारखानदार असाच सामना गेल्या १८ वर्षांपासून सुरू आहे; पण यावेळी शेट्टी हेच राष्ट्रवादी 

आघाडीचे उमेदवार असल्याने इच्छा नसली तरी दोन्ही काँग्रेसच्या कारखानदारांना त्यांच्या मागेच ताकद उभी करावी लागेल. या मतदारसंघातील ८ पैकी चार कारखान्यांवर राष्ट्रवादी किंवा काँग्रेसची सत्ता आहे. ‘गुरुदत्त’चे माधवराव घाटगे विधानसभेला शेट्टी यांच्या विरोधात होते, यावेळची त्यांची भूमिका अनिश्‍चित आहे.

‘वारणा’चे सर्वेसर्वा माजी मंत्री विनय कोरे व शेट्टी यांचा पूर्वापार संघर्ष आहे. त्यातून कोरे हे युतीच्या उमेदवारामागे राहतील अशी शक्‍यता आहे. ‘दत्त-शिरोळ’चे गणपतराव पाटील, ‘जवाहर’चे प्रकाश आवाडे, ‘शरद-नरंदे’चे राजेंद्र पाटील-यड्रावकर हे आघाडी धर्म म्हणून शेट्टींच्याच मागे राहतील. दालमिया व पंचगंगा हे दोन कारखाने खासगी व्यक्तींकडे चालवण्यास आहेत. उदयसिंगराव गायकवाड कारखान्यावर मानसिंगराव गायकवाड यांचे वर्चस्व असले तरी ते नेमके कोणासोबत, याचा उलगडा अजून झालेला नाही. 

दृष्टिक्षेपात मतदारसंघातील कारखाने 
कोल्हापूर 

  •     राष्ट्रवादीची सत्ता - बिद्री, गडहिंग्लज, सरसेनापती
  •     शिवसेनेची सत्ता - कुंभी, मंडलिक-हमीदवाडा
  •     काँग्रेस- भोगावती, डी. वाय. पाटील-गगनबावडा
  •     भाजप- शाहू-कागल, आजरा-गवसे
  •     महाडिक - राजाराम-बावडा
  •     दौलत व इंदिरा महिला कारखाने बंद

हातकणंगले

  •     राष्ट्रवादी- शरद नरंदे
  •     काँग्रेस - जवाहर-हुपरी, दत्त-शिरोळ
  •     खासगी-दालमिया, गुरुदत्त, पंचगंगा, गायकवाड
  •     विनय कोरे- वारणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com