Loksabha 2019 : महास्वामी म्हणाले, किती माताधिक्य द्या

सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रविवारी मार्गदर्शन करताना उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी. या प्रसंगी डावीकडून पालकमंत्री विजयकुमार देशमुख, प्रशांत परिचारक, महाराज नीलकंठ शिवाचार्य, रघुनाथ कुलकर्णी, अशोक निंबर्गी
सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रविवारी मार्गदर्शन करताना उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी. या प्रसंगी डावीकडून पालकमंत्री विजयकुमार देशमुख, प्रशांत परिचारक, महाराज नीलकंठ शिवाचार्य, रघुनाथ कुलकर्णी, अशोक निंबर्गी

सोलापूर - सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात मी ३०-३५ वर्षे सेवा केली आहे. राजकारणात मी नवखा असल्याचे सांगत भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामींनी भाजप कार्यकर्त्यांना ‘हाऊज द जोश’ विचारत तुम्ही शरद बनसोडेंना दीड लाख मताधिक्‍याने खासदार केले. मला किती मताधिक्‍याने खासदार कराल? असा प्रश्‍न केला. महास्वामींच्या ‘हाऊज द जोश’ला टाळ्यांच्या कडकडाटात उत्तर देत तीन लाखांचे मताधिक्‍य तुम्हाला देऊ, असा विश्‍वास भाजप कार्यकर्त्यांनी दिला. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज सोलापुरातील शांतिसागर मंगल कार्यालयात झाली. त्या वेळी भाजप उमेदवार महास्वामींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, भाजपचे रघुनाथ कुलकर्णी, महापौर शोभा बनशेट्टी, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर किशोर देशपांडे, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, नागणसूरचे महाराज नीलकंठ शिवाचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. महास्वामी म्हणाले, या निवडणुकीच्या माध्यमातून देशाची चिंता तुम्ही माझ्या खांद्यावर दिली आहे. मला देशाच्या चिंतेत टाकून तुम्ही निश्‍चिंत राहू नका. सोलापूरचे मतदान १८ एप्रिलला आहे. ८ आणि १ यांची बेरीज नऊ होते. नऊ आकडा पूर्णत्वाकडे नेणारा आहे. आपला विजय निश्‍चित आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष पवार, शहराध्यक्ष निंबर्गी, महापौर बनशेट्टी, किशोर देशपांडे यांनीही मनोगते व्यक्त केली. 

महायुतीचा आज मेळावा
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम या महायुतीचा मेळावा उद्या (सोमवार) सकाळी ११ वाजता सोलापुरातील हेरिटेज गार्डनमध्ये होणार आहे. या मेळाव्यानंतर महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्या लाटेची हवा अजूनही आहे. या हवेचे रूपांतर मतदानात करायचे आहे. सोलापूरच्या भाजप कार्यकर्त्यांनी मला तीन वेळा आमदार केले. उज्ज्वला शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला. भाजपचा कार्यकर्ता सक्षम आहे. त्याला काय करायचे, हे चांगले माहितीही आहे.  
- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री

केंद्र व राज्य सरकारने केलेल्या दमदार कामगिरीमुळे पंतप्रधान मोदी यांना आणखी एक संधी द्यावी, अशी जनतेची मानसिकता आहे. पंढरपूर, मंगळवेढा तालुक्‍यात आम्ही प्रचाराच्या बैठका व मेळावे सुरू केले आहेत. आमच्यावर जी जबाबदारी सोपविली जाईल, ती जबाबदारी आम्ही पार पाडू. महास्वामींना पंढरपूर-मंगळवेढा तालुक्‍यातून चांगले मताधिक्‍य देऊ. 
- प्रशांत परिचारक, आमदार

सोलापूरमधून उज्ज्वला शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला आहे. २०१९ मध्ये पुन्हा सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करून पराभवाची हॅट्‌ट्रिक आपल्याला साधायची आहे. यंदाची निवडणूक ही देशासाठी महत्त्वाची आहे. फिर एक बार, मोदी सरकार हा संदेश घेऊन आपण वाड्यावस्त्या व शेवटच्या मतदारांपर्यंत जावे. आपला विजय निश्‍चित आहे. 
- रघुनाथ कुलकर्णी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com