Loksabha 2019 : विखे-पवार संघर्षाचीच झालर!

ॲड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील
बुधवार, 17 एप्रिल 2019

मतदारसंघातील प्रलंबित प्रश्‍न

  • नगर शहरातील उड्डाण पूल रखडला
  • दक्षिणेतील ६ तालुके धरणांच्या पाण्यापासून वंचित
  • साकळाई पाणी योजना वर्षानुवर्षे कागदावरच
  • नगरमधील एमआयडीसीचे विस्तारीकरण लांबले
  • पांढरीपूल येथील फूड इंडस्ट्रीस अद्याप उद्योगांची प्रतीक्षा

नगरमध्ये लढत विखे-पाटील विरुद्ध जगताप अशी असली, तर त्यात अंतःस्थ अनेक पदर आहेत. गणिते आहेत. थेट लढत असल्याने चुरस वाढवली आहे.

नगर मतदारसंघातील निवडणूक प्रामुख्याने भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप या उमेदवारांमध्येच आहे. तथापि, या निवडणुकीस थेट ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विखे पाटील घराण्यातील पारंपरिक संघर्षाची झालर आहे. काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे उमेदवार असलेले आपले पुत्र डॉ. सुजय यांच्या प्रचारात उघडपणे उतरल्याने चुरस वाढली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, पंकजा मुंडे आदी दिग्गजांच्या सभांचा भाजपतर्फे धडाका आहे. राष्ट्रवादीतर्फे ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, फौजिया खान, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या सभांनी राळ उठविली आहे. 

नगर मतदारसंघात १८ लाख ४६ हजार ३१४ मतदार असून, यात पुरुष ९ लाख ६६ हजार ७९७, तर महिला मतदार ८ लाख ७९ हजार ४३१ आहेत. विखे पाटील आणि जगताप हे दोन्हीही उमेदवार मराठा समाजातील आहेत. तथापि, दोन्ही नेत्यांनी जातीची गणिते समोर ठेवून नेत्यांच्या सभांचे आयोजन केले आहे. व्यक्तिगत संबंध आणि पक्षीय राजकारणावरही मतांची गणिते अवलंबून आहेत. भाजपचे खासदार दिलीप गांधींना ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने नाराज जैन समाजाचा कौल कोणाला मिळणार, याचीही उत्सुकता आहे.

जगताप परिवारास प्रथमच जिल्ह्याच्या नेतृत्वाची संधी मिळणार आहे. दुसरीकडे विखे भाजपमध्ये आल्याने त्याचा ज्यांना भविष्यात धोका जाणवतो, ती नेतेमंडळी काम करतील? असा प्रश्‍न विचारला जातोय. त्यातही विखेंना राहुरी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक अपेक्षा आहेत.

भाजप आमदार शिवाजी कर्डिले साथ करतील, असे त्यांना वाटते. मात्र, कर्डिलेंचे कार्यकर्ते संग्राम यांच्या प्रचारात दिसू लागल्याने मतदार संभ्रमात आहेत. पारनेर तालुक्‍यावर जगतापांच्या तुलनेत विखेंचे अधिक वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते. या तालुक्‍यात अगोदरच औषधापुरती असलेली काँग्रेस विखेंनी नामशेष केली. बोटावर मोजण्याइतकेच असलेले भाजपचे पदाधिकारीही दंगल आणि खंडणीच्या गुन्ह्यात अडकले आहेत. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पुढे येऊ न देता प्रचाराची वेळ आली आहे.

श्रीगोंद्यात आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे आणि घनश्‍याम शेलार हे जगतापांसाठी, तर बबनराव पाचपुते यांच्यासह इतर नेत्यांनी विखेंसाठी कंबर कसली आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पालकमंत्री राम शिंदेंकडे आहे. त्यांनी स्वतः दोन्ही तालुक्‍यांमध्ये लक्ष घातले आहे. त्यांना शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या जोरकस प्रचार यंत्रणेचा सामना करावा लागतोय. पाथर्डी-शेवगावमध्ये भाजप आमदार मोनिका राजळे यांनी विखेंसाठी, तर राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र व चंद्रशेखर घुले यांनी जगताप यांच्यासाठी जोरदार मोहीम उघडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Nagar Constituency Sujay Vikhe Patil Sharad Pawar Politics