Loksabha 2019 : महाडिकांची शेट्टींसोबत गट्टी की सोडचिठ्ठी?

Raju-and-Nana
Raju-and-Nana

इस्लामपूर - शिराळा मतदारसंघात लोकसभेसाठीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाआघाडीचा भाग असलेल्या खासदार राजू शेट्टी यांचा प्रचार माजी आमदार मानसिंगराव नाईक करतील. तर विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक खासदार शेट्टींची मैत्री दूर सारत आता युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारात असतील. ही विधानसभा निवडणूक लढवायचीच या इराद्याने तयारीला लागलेल्या सम्राट महाडिक यांची मात्र मोठी गोची झाली आहे. त्यांना एकतर शेट्टींसोबत गट्टी कायम ठेवावी लागेल किंवा सोडचिठ्ठी द्यावी लागेल.

वाळवा-शिराळा तालुक्‍याच्या राजकीय पटलावर महाडिक गटाची दखलपात्र अशी स्थिती आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी ही ताकद टिकवून ठेवताना या कुटुंबाचे पतसंस्था, शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून गावागावांमध्ये नेटवर्क तयार झाले आहे. त्या बळावर महाडिकांनी या दोन्ही मतदारसंघात बऱ्याचवेळा वेगवेगळ्या ‘राजकीय लिटमस टेस्ट’ केल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी यशाचीही चव चाखली आहे.

या दोन तालुक्‍यांत ते राजकीय तराजूत आपले माप प्रसंग, वेळ पाहून टाकत आपले मूल्य वाढवत नेतात. गेल्या दोन निवडणुकांत त्यांनी शेट्टींना साथ करताना जयंतविरोध हे सूत्र ठेवले आहे. त्याचवेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत मात्र तीच भूमिका ठेवली आहे, असेही नाही. आता शेट्टी जयंतमित्र झाले आहेत. त्यामुळे महाडिकांची नेमकी भूमिका काय हे ठरलेले नाही. या निर्णयाला आणखी एक पदर आहे तो शिराळा मतदारसंघात नानासाहेबांचे  चिरंजीव सम्राट यांनी ठोकलेला शड्डू. ते दररोज दोन्ही तालुक्‍यांत भटकंती करीत असून संपर्क, भेटीगाठी, महाडिक युवा शक्तीच्या शाखांचे उद्‌घाटन असा सपाटा सुरू आहे. मात्र आता शेट्टी-जयंत आघाडीमुळे त्यांना निर्णय करणे अवघड झाले आहे. पराभूत झाल्यापासून मानसिंगरावांनी पायाला भिंगरी बांधून आपली तयारी कायम ठेवली आहे.

आता ते शेट्टींच्या मागे सारी ताकद पणाला लावतील. त्याचवेळी महाआघाडीच्या धर्मानुसार शेट्टींना मानसिंगरावांची साथसोबत करावी लागेल. 

दुसरीकडे आमदार शिवाजीरावांनी शेट्टींची साथ सोडून मानेंच्या प्रचारास सुरवात केली आहे. शिराळ्यातील दोन्ही संभाव्य उमेदवारांनी भूमिका घेतल्या आहेत. मात्र, महाडिकांना या दोघांपैकी एकासोबत काम करायचे अवघड झाले आहे. कारण दोघेही त्यांचे पुढचे विरोधकच आहेत.

कोल्हापुरात राष्ट्रवादी; सांगलीतला पक्ष कोणता?
आता महाडिकांना आठवडाभरात भूमिका घ्यावीच लागेल असे दिसते. मौन बाळगणे त्यांना परवडणारे नाही कारण कार्यकर्त्यांची फौज कायम सरावात ठेवावी लागते. दुसरीकडे महाडिकांची मुळे असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात महाडिकांचे पुतणे खासदार धनंजय राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा लढत आहेत. अर्थात महाडिकांना दोन जिल्ह्यांत वेगवेगळ्या भूमिका नव्या नाहीत. मात्र, शिराळ्याच्या पुढच्या राजकीय समीकरणात त्यांना सोयीची भूमिका ठरवणे अवघड झाले आहे हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com