Loksabha 2019 : मोदी, शहांना हटवाच - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

युवकांना स्वप्ने दाखवून त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणाऱ्या व जवानांच्या नावाने निर्लज्जपणे मते मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना राजकीय क्षितिजावरून कायमचे घालवा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केले. यापूर्वी 2014 मध्ये आपण पाहिलेले स्वप्न एक फसवे स्वप्न होते, असे समजून या वेळी मात्र जबाबदारीने मतदान करून देशाची लोकशाही वाचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

इचलकरंजी - युवकांना स्वप्ने दाखवून त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणाऱ्या व जवानांच्या नावाने निर्लज्जपणे मते मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना राजकीय क्षितिजावरून कायमचे घालवा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केले. यापूर्वी 2014 मध्ये आपण पाहिलेले स्वप्न एक फसवे स्वप्न होते, असे समजून या वेळी मात्र जबाबदारीने मतदान करून देशाची लोकशाही वाचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

येथील यशोलक्ष्मी भवनालगत असलेल्या मैदानावर राज यांची आज सायंकाळी भव्य सभा झाली. सभेला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. देशाची सद्यस्थिती, भाजपचा भ्रष्ट कारभार आणि खोटे बोलण्याच्या गोबेल्स नीतीवर कडाडून टीका करीत ठाकरे म्हणाले, की 1930 ते 32 या कालावधीत हिटलर यांनी जी पद्धत अवलंबली, याच पद्धतीचे अनुकरण मोदी करीत आहेत. लोकशाही भ्रष्ट करून हुकूमशाहीची स्वप्ने ते पाहत आहेत. यासाठी आतापासूनच सर्वांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. यापूर्वी दाखविलेली स्वप्ने यावर मोदी काहीच बोलायला तयार नाहीत. गेल्या पाच वर्षांत एकही पत्रकार परिषद न घेतलेले देशाचे एकमेव पंतप्रधान म्हणून मोदी यांची ख्याती आहे. पत्रकारांच्या प्रश्‍नाला काय उत्तरे द्यायची, याचीच भीती त्यांना आहे.

राज म्हणाले, 'या वेळची निवडणूक खूप महत्त्वाची आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना मूर्ख बनवत स्वप्ने दाखवायची आणि नंतरच्या काळात त्यावर काहीच बोलायचे नाही, याची प्रचीती आपणाला आली आहे. नोटाबंदी, जीएसटी यामुळे देशातील 50 कोटी युवक बेरोजगार झाले आहेत. मोदी यांना देशाची आर्थिक व्यवस्था दहा ते पंधरा लोकांच्या हातातच द्यावयाची आहे. त्यासाठी अनेक स्वप्ने दाखवत ते युवकांनाही भावनाविवश करीत आहेत. सैनिकांच्या नावावर मते मागून पुन्हा एकदा हिटलर नीती वापरणाऱ्यांना आता योग्य जागा दाखविण्याची गरज आहे.''

Web Title: Loksabha Election 2019 Raj Thackeray Speech Narendra Modi Amit Shaha Politics