Loksabha 2019 : जातीच्या समीकरणात हरवला विकास

अभय दिवाणजी
बुधवार, 10 एप्रिल 2019

मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्‍न
    मूलभूत सुविधांअभावी शेती, उद्योग, पिण्याच्या पाण्याची समस्या
    स्मार्टसिटीच्या विकासकामांना गती आवश्‍यक
    रखडलेली विमानसेवा, मोठ्या उद्योगांअभावी तरुणाईचे स्थलांतर
    वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी ठोस पावले गरजेची 
    नमामी चंद्रभागा योजना, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास 
    रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरण रखडले

पुरोगामी म्हणवणाऱ्या सोलापूर मतदारसंघात जातीच्या गणिताला प्रचंड महत्त्व आल्याने; त्याच्यासमोर विकास, मतदारसंघातील प्रश्‍न, जनतेच्या आशा-आकांक्षा हे मुद्दे मागे पडलेत. तिरंगी लढतीत कोण बाजी मारतो, हीच उत्सुकता आहे.

विकासाच्या मुद्द्यांपासून कोसो दूर असलेली सोलापूर मतदारसंघाची निवडणूक जातीय समीकरणे घट्ट करताना दिसते आहे. या निवडणुकीत ‘काँटे की टक्कर’ होत असतानाच तरुणांमध्ये अजूनही मोदी फिव्हरचा जोर जाणवतो आहे. भाजपचे उमेदवार ‘डॉ. जयसिद्धेश्‍वर महाराज की जय...’चाच नारा सध्यातरी मतदारसंघात घुमतोय. 

काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीकडून सुशीलकुमार शिंदे, भाजप- शिवसेना युतीकडून डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी, तर वंचित बहुजन आघाडीतर्फे ॲड. प्रकाश आंबेडकर रिंगणात आहेत. या प्रमुख तीन उमेदवारांबरोबरच अन्य दहाजण नशीब आजमावत आहेत. धनगर, लिंगायत, पद्मशाली, दलित व मुस्लिम अशा बहुजमातींच्या प्रभावाखाली हा मतदारसंघ आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड. प्रकाश (बाळासाहेब) यांनी मतदारसंघातून अर्ज भरल्यानंतर येथील समीकरणेच बदलली आहेत. आमच्या उद्धारकर्त्याला आम्ही पाहू शकलो नाही. किमान आता त्यांच्या नातवाला मत देऊन त्यांच्या ऋणात राहण्याच्या आणाभाका घेतल्या जात आहेत. 

डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी हे लिंगायत समाजाकडून पुजल्या जाणाऱ्या जंगम जातीचे असल्याने लिंगायत समाजातून मोठा पाठिंबा मिळत आहे. तसेच पद्मशाली, धनगर आणि उच्चवर्णीयांकडून महास्वामींना मोठ्या अपेक्षा आहेत. या जातीय समीकरणातून ते बाजी मारण्याची चिन्हे दिसताहेत. 

गेल्या ४० वर्षांपासून राज्याच्या मंत्रिमंडळात वारंवार स्थान, मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री अशा विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहिलेल्या सुशीलकुमार शिंदेंना गेल्या निवडणुकीतील पराभवाने सत्तेपासून दूर राहावे लागले. पारंपरिक काँग्रेसचा मतदार, तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची साथ, ही त्यांची जमेची बाजू असली तरी हे मतदार किती साथ देतात, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Solapur-Constituency Politics Caste Aghadi Yuti