Loksabha 2019 : उदयनराजे भोसले साधणार का हॅट्‌ट्रिक?

उमेश बांबरे
शुक्रवार, 29 मार्च 2019

सातारा लोकसभेचे कारभारी

  • साताऱ्यातून नऊ आणि कऱ्हाडातून सहा जण झाले खासदार
  • यशवंतराव चव्हाण, डी. आर. चव्हाण चार वेळा खासदार
  • प्रतापराव भोसले, प्रेमलाकाकी, पृथ्वीराज चव्हाण तीनदा खासदार
  • लक्ष्मणराव पाटील, श्रीनिवास पाटील, उदयनराजे दोन वेळा खासदार
  • शिवसेनेतून हिंदूराव नाईक- निंबाळकर झाले होते खासदार
  • शेकापतून डी. आर. चव्हाण, कम्युनिस्ट पक्षातून क्रांतिसिंह नाना पाटील झाले खासदार
  • किसन वीर, अभसिंहराजे भोसले, यशवंतराव मोहिते एकदाच संधी

सातारा - सातारा व कऱ्हाड लोकसभेतून आतापर्यंत अनुक्रमे नऊ आणि सहा जणांनी खासदार म्हणून निवडून येण्याचा बहुमान मिळविला आहे.

साताऱ्यातून (कै.) यशवंतराव चव्हाण यांनी चार वेळा, प्रतापराव भोसले यांनी तीन वेळा, लक्ष्मणराव पाटील आणि उदयनराजे भोसले यांनी प्रत्येकी दोन वेळा निवडून गेले, तर कऱ्हाडातून दाजी साहेबराव ऊर्फ डी. आर. चव्हाण यांनी चार वेळा, प्रेमलाकाकी चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण प्रत्येकी तीन वेळा, तर श्रीनिवास पाटील दोन वेळेस खासदार झाले. या वेळेस खासदार उदयनराजे भोसले हे प्रतापराव भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्याप्रमाणे हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. सातारा जिल्ह्यातून आजपर्यंत १५ जणांना खासदार होण्याची संधी मिळाली आहे. 

सातारा व कऱ्हाड असे लोकसभेचे दोन मतदारसंघ पूर्वी होते. यामध्ये दक्षिण सातारा व उत्तर सातारा असे मतदारसंघांचे नाव होते. २००९ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाली. यामध्ये सातारा आणि माढा असे विभाजन झाले. यात साताऱ्यात वाई, सातारा, कोरेगाव, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, पाटण अशा विधानसभा मतदारसंघांचा समावेश झाला, तर माढा लोकसभा मतदारसंघात फलटण आणि माण विधानसभा मतदारसंघांचा समावेश झाला. १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी दक्षिण सातारा आणि उत्तर सातारामधून दोन खासदार निवडून आले होते.

आतापर्यंत लोकसभेच्या १६ निवडणुका झाल्या असून, २००९ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना होऊन सातारा लोकसभा स्वतंत्र मतदारसंघ झाला. यातून राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार दोन वेळा निवडून आले. सातारा लोकसभा मतदारसंघ सुरवातीला दक्षिण सातारा असे संबोधले जात होते.

१९५२ च्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे व्यंकटराव पवार एक लाख ३३ हजार मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर १९५७ च्या निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे क्रांतिसिंह नाना पाटील एक लाख ४५ हजार १९४ मतांनी विजयी झाले. १९६२ मध्ये काँग्रेसचे के. एम. ऊर्फ किसन वीरआबा एक लाख ६५ हजार मतांनी विजयी झाले होते.

त्यांनी नाना पाटलांचा पराभव केला होता. १९६७ मध्ये काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण दोन लाख ६० हजार ८९५ मतांनी विजयी झाले. त्यांच्या विरोधात शेकापचे केशवराव पवार होते.

त्यानंतर १९७१, १९७७, १९८० पर्यंत यशवंतराव चव्हाण विजयी झाले. त्यांनी या मतदारसंघातून चार वेळा खासदार होण्याचा विक्रम केला. १९८४ काँग्रेसचे प्रतापराव भोसले खासदार झाले, त्यांना दोन लाख ७० हजार मते मिळाली होती. त्यानंतर १९८९, १९९१ असे सलग तीन वेळा प्रतापराव भोसले खासदार झाले. त्यानंतर शिवसेनेचे हिंदूराव नाईक- निंबाळकर खासदार झाले. १९९८ च्या निवडणुकीत अभयसिंहराजे भोसले हे तीन लाख ८९ हजार मतांनी विजयी झाले. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि पहिल्याच लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव पाटील विजयी झाले. ते दोन पंचवार्षिक खासदार होते. २००९ मध्ये उदयनराजे भोसले खासदार झाले ते सलग दोन पंचवार्षिक खासदार आहेत. आता तिसऱ्यांदा ते रिंगणात असून, हॅटट्रिक करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

कऱ्हाड लोकसभा मतदारसंघ हा उत्तर सातारा म्हणून ओळखला जात होता. १९५२ च्या पहिल्या निवडणुकीत गणेश आळतेकर काँग्रेसमधून पहिले खासदार झाले. त्यांना ९१ हजार ३१९ मते मिळाली होती. त्यानंतर १९५७ च्या निवडणुकीत दाजी साहेबराव चव्हाण हे शेकापमधून खासदार झाले. त्यानंतर १९६२ मध्ये डी. आर. (दाजी साहेबराव) चव्हाण हे काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले. त्यानंतर ते १९६७, १९७१ असे सलग चार वेळा खासदार झाले. त्यानंतर १९७७ मध्ये काँग्रेसमधून प्रेमलाकाकी चव्हाण खासदार झाल्या, तर १९८० मध्ये काँग्रेस आयमधून यशवंतराव मोहिते दोन लाख ४० हजार मतांनी विजयी झाले. १९८४ व १९८९ मध्ये पुन्हा प्रेमलाकाकी चव्हाण इंदिरा काँग्रेसमधून खासदार झाल्या. १९९१ च्या निवडणुकीत काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण खासदार झाले. ते सलग १९९६, १९९८ मध्ये तीन वेळ खासदार झाले. १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीतून खासदार झाले. ते २००४ मध्ये पुन्हा याच मतदारसंघातून खासदार झाले. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ रद्द होऊन सातारा लोकसभा मतदारसंघात समावेश झाला.

Web Title: Loksabha Election 2019 Udayanraje Bhosale Hattrick Politics