Loksabha 2019 : मताधिक्‍य की धक्‍कातंत्र?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीतील मतविभागणी 
सातारा : राष्ट्रवादी- ९७ हजार ९६४, काँग्रेस- सात हजार १७८, भाजप- ५० हजार १५१, शिवसेना - २५ हजार ४२१.
वाई : राष्ट्रवादी- एक लाख १२१८, काँग्रेस- ६५ हजार ५१६, भाजप- २५ हजार २५५, शिवसेना- २३ हजार ३४३.
कोरेगाव : राष्ट्रवादी- ९५ हजार २१३, काँग्रेस- ४७ हजार ९६६, भाजप-१३ हजार १२३, शिवसेना -१५ हजार ८३२. 
कऱ्हाड उत्तर : राष्ट्रवादी-७८ हजार ३२४, काँग्रेस ५७ हजार ८१७, भाजप (स्वाभिमानी) ४३ हजार ९०३, शिवसेना ५,६५७.
कऱ्हाड दक्षिण : राष्ट्रवादी- शून्य, काँग्रेस- ७६ हजार ८३१, भाजप- ५८ हजार ६२१, शिवसेना - २,३७३.
पाटण : राष्ट्रवादी- ८५ हजार ५९५, काँग्रेस-७,६४२, भाजप- २,१०२, शिवसेना- एक लाख ४,४१९.

सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध भाजप- शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. हुकूमशाही विरुद्ध निर्भय सातारा अशा दोन टोकाच्या लढतीत खासदार उदयनराजेंचे मताधिक्‍य कमी होणार की वाढणार, याचा अंदाज अनेकजण बांधत आहेत. अशा परिस्थितीत वाईत मदन भोसले व साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजेंच्या भूमिकेवर निवडणुकीची गणिते ठरणार आहेत. 

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले तिसऱ्यांदा मैदानात आहेत. यापूर्वी दोन वेळेस त्यांच्या मताधिक्‍यात वाढ झाल्याचे चित्र आहे. २००९ मध्ये उदयनराजेंना दोन लाख ९७ हजार ५१५ मतांचे तर २०१४  मध्ये तीन लाख ६६ हजार ५९४ मतांची आघाडी होती.

२०१४ च्या निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात १७ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये १२ अपक्ष आणि सहा विविध पक्षांच्या उमेदवारांचा समावेश होता. पण, यावेळेस उमेदवारांची संख्या निम्म्यावर आली असून सध्या नऊ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये चार अपक्ष आणि उर्वरित पाच विविध पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. 

गेल्यावेळच्या निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात आम आदमी, महायुती आणि एक अपक्ष या चार उमेदवारांनी सर्वाधिक मते घेतली. पण, ते उदयनराजेंच्या जवळपासही पोचू शकले नाहीत. यामध्ये अपक्ष पुरुषोत्तम जाधव एक लाख ५५ हजार ९३७, आम आदमी पार्टीचे राजेंद्र चोरगे यांना ८२ हजार ४८९, महायुतीचे अशोक गायकवाड यांना ७१ हजार ८०८ मते मिळाली होती. या सर्वांच्या मतांची बेरीज तीन लाख दहा हजार २३४ होते. तसेच नोटा आणि इतर अपक्ष उमेदवारांना पडलेल्या मतांची एकत्रित बेरीज ही चार लाख ५२ हजार होते. त्यामुळे सर्व विरोधी उमेदवारांची मते मिळवूनही उदयनराजेंना पडलेल्या मतांची बरोबरी झालेली नाही. यावेळेस मात्र, चित्र वेगळे आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील असून त्यांच्यासोबत भाजप, रिपब्लिकन पक्षही आहे. गेल्यावेळी विरोधक एकत्र नव्हते. 

 

Web Title: Loksabha Election 2019 Udayanraje Bhosale Narendra Patil Politics