Loksabha 2019 : दहशत असती तर अर्जही भरून दिला नसता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

माझ्या खासदार निधीतून २५ कोटी २६ लाख रुपये स्थानिक विकासासाठी खर्च केला आहे. त्याचा पुरावा मी येथे देत आहे. माझी दहशत असती तर तुम्हाला उमेदवारी अर्जही भरून दिला नसता. अन्याय होत असेल तर मी गप्प बसत नाही, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र पाटील यांना लगावला.

तांबवे - माझ्या खासदार निधीतून २५ कोटी २६ लाख रुपये स्थानिक विकासासाठी खर्च केला आहे. त्याचा पुरावा मी येथे देत आहे. माझी दहशत असती तर तुम्हाला उमेदवारी अर्जही भरून दिला नसता. अन्याय होत असेल तर मी गप्प बसत नाही, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र पाटील यांना लगावला. 

वसंतगड (ता. कऱ्हाड) येथे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस, मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार खासदार भोसले यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषदेच्या तांबवे गटातील कार्यकर्त्यांच्या आयोजित सभेत ते बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य हिंदूराव पाटील, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, अजित पाटील-चिखलीकर, आर. वाय. नलवडे, सुनील पाटील, निवासराव पाटील, सह्याद्री कारखान्याचे संचालक पी. डी. पाटील, रघुनंदन बागवडे, तांबवेचे सरपंच संतोष कुंभार, उपसरपंच धनंजय ताटे, शंकर पाटील, साहेबराव गायकवाड, ॲड. विकास निकम, विजय चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

खासदार भोसले म्हणाले, ‘‘विरोधकांनी प्रचारासाठी ९० छोटे हत्ती आणले आहेत. त्यातील १० ते १५ छोटे हत्ती बाहेर काढले आहेत. छोटे हत्ती कधी बाहेर काढतायत, त्याच्यावर माझेही लक्ष आहे. बघूया मिशीवर किती पीळ मारतायत. स्वतः आमदार असताना माझ्या निधीतून गावात विकासकाम केले आहे. तेव्हा तुम्ही काय केले स्वतःच्या भागासाठी, गावासाठी ते सांगा. किती वाहने आणायची, खर्च किती करायचा, याचा काही ‘अजेंडा’ त्यांच्याकडे नाही, त्यामुळे ते माझ्या योग्यतेचे नाहीत, केवळ बेताल वक्तव्ये करत आहेत.’’  

आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘‘भाजप सरकार आता निश्‍चित जाणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे आणि उदयनराजे भोसले यांना मताधिक्‍याने दिल्लीत पाठवावे.’’ सत्यजितसिंह पाटणकर यांनी मोदी-शहा या जोडगोळीने थापा मारून सरकार आणल्याचे नमूद केले. निवास शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. विश्वासराव निकम यांनी प्रास्ताविक केले. विजय चव्हाण यांनी आभार मानले.

Web Title: Loksabha Election 2019 Udayanraje Bhosale Politics