Loksabha 2019 : उदयनराजेंविरोधात शिवसेना की भाजप

Udayanraje-Bhosale
Udayanraje-Bhosale

सातारा - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कालच (ता. 9) साताऱ्यातून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीरही केली. आता उदयनराजेंच्या विरोधात भाजप-शिवसेना कोणता उमेदवार देणार, यावरच निवडणुकीतील चुरस अवलंबून आहे. शिवसेनेकडूनही अनेकांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून नरेंद्र पाटील यांचे नाव पुढे केले जात आहे. युतीला सक्षम उमेदवार न मिळाल्यास मोठ्या मताधिक्‍याने उदयनराजे हॅट्ट्रिक करतील, असे सध्याचे राजकीय चित्र दिसते.

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सलग तिसऱ्यांदा साताऱ्यातून विद्यमान खासदार उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, माढ्यातून पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव निश्‍चित झाले आहे. उदयनराजेंबाबतच्या नाराजीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचे ओळखून श्री. पवार यांनी उदयनराजेंनाच पुन्हा उमेदवारी देण्याची भूमिका घेतली. त्यानुसार राष्ट्रवादीने मुंबईतील बैठकीत शिवेंद्रसिंहराजे व उदयनराजेंतील वादावर खुद्द शरद पवार यांनी समेट घडवून आणून उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले. दोन्ही राजांतील वादाच्या पार्श्‍वभूमीवर उदयनराजेंना नाकारल्यास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचीही नावे पुढे आली होती. मात्र, आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

आता साताऱ्यातून शिवसेना व भाजप युतीचा उमेदवार कोण, याबाबत उत्सुकता आहे. सध्या तरी युतीच्या जागावाटपात सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचे सांगितले होते. पण, या मतदारसंघावर भाजपनेही दावा सोडलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार भाजपकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी या मतदारसंघात संपर्कही सुरू ठेवला आहे. त्यांच्या उमेदवारीला शिवसेना हिरवा कंदील देणार का, हेही महत्त्वाचे आहे. जागावाटपात हा मतदारसंघ भाजपकडे गेल्यास निश्‍चितच नरेंद्र पाटील हेच उमेदवार असतील, अशी शक्‍यता आहे. त्यांच्याशिवाय भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, पुरुषोत्तम जाधव हे इच्छुक आहेत.

उदयनराजेंशी दोन हात करणारा उमेदवार सध्या तरी शिवसेनेकडे नाही. त्यांच्यातील पक्षाचा एखादा पदाधिकारी किंवा जिल्हाध्यक्षच या निवडणुकीसाठी रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहेत. शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांची नावे चर्चेत आहेत. त्याबाबतही शिवसेनेत एकमत नाही. भाजपने नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिल्यास कऱ्हाड, पाटण, जावळी, महाबळेश्‍वरमध्ये उदयनराजेंना अडचणीचे होणार आहे. भाजप, शिवसेनेकडून उमेदवार कोण, यावरच मतदारसंघातील आगामी लढतीचे चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेकडून ऐनवेळी आयात उमेदवार दिला जाण्याचीही शक्‍यता आहे. त्यामुळे युतीचा उमेदवार किती सक्षम असेल, त्यावर उदयनराजेंचे मताधिक्‍य अवलंबून आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या जागेचे काय?
मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने रिपब्लिकन पक्षासाठी हा मतदारसंघ सोडला होता. या पक्षातर्फे पक्षाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी निवडणूक लढवली होती. या वेळीही रिपब्लिकन पक्षाने सातारा मतदारसंघावर दावा केला आहे. युतीत शिवसेना हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडणार का, हा खरा प्रश्‍न आहे. कारण, सध्या रिपब्लिकन पक्ष व भाजपत समेट असल्याने शिवसेना कोणती भूमिका घेणार, यावरच युतीचा उमेदवार ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com