Loksabha 2019 : उदयनराजेंना राज्यातून आमंत्रण

उमेश बांबरे
सोमवार, 8 एप्रिल 2019

आपल्या हटके स्टाइलने सर्वांवर प्रभाव टाकणारे खासदार उदयनराजे भोसले यांना आता राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मागणी होऊ लागली आहे. त्यामध्ये परभणी, बीड, बुलडाणा, नाशिक, मावळ, नगर आदी ठिकाणच्या सभांसाठी त्यांना निमंत्रण आले आहे.

सातारा - आपल्या हटके स्टाइलने सर्वांवर प्रभाव टाकणारे खासदार उदयनराजे भोसले यांना आता राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मागणी होऊ लागली आहे. त्यामध्ये परभणी, बीड, बुलडाणा, नाशिक, मावळ, नगर आदी ठिकाणच्या सभांसाठी त्यांना निमंत्रण आले आहे. त्यामुळे सातारा लोकसभेच्या प्रचारात आघाडी घेतलेल्या उदयनराजेंना पक्षाच्या इतर सहा मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ द्यावा लागणार आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांची बोलण्याची व वागण्याची स्टाईल आता सर्वांवर प्रभाव टाकू लागली आहे. यामध्ये तरुणाईसह पक्षातील दिग्गज नेत्यांनाही त्यांची भुरळ पडली आहे. त्यांची कॉलर उडविण्याच्या स्टाईलची तर दस्तुरखुद्द शरद पवार यांनी दखल घेतली होती. कऱ्हाडच्या सभेत त्यांनी स्वत: उदयनराजेंची कॉलर उडविली होती. तसेच त्यांचे प्रभावी भाषणशैलीही सभेतील उपस्थितांना घोषणा देण्यास भाग पाडते आहे. ‘एक बार मैने कमिटमेंट कर दी, तो मैं आपनीही नहीं सुनता...’हा डायलॉग तर त्यांना तरुण कार्यकर्ते आवर्जून म्हणायला सांगतात. त्यामुळे उदयनराजे महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून फिरू शकतात, हे खुद्द शरद पवार यांनी ओळखले आहे. पण, पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचे नाव नसलेतरी त्यांच्या संभाषण कौशल्यामुळे आता त्यांना तब्बल सहा मतदारसंघांतून प्रचार सभांसाठी आमंत्रण आले आहे. यामध्ये मावळचे पार्थ पवार यांच्या सभेसाठी त्यांना जावे लागणार आहे. तसेच परभणी, बीड, बुलडाणा, नाशिक व नगर येथील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारात ते सहभागी होणार आहेत. 

सातारा लोकसभा मतदारसंघात त्यांनी सुरवातीपासून प्रचारात आघाडी घेतली आहे. यातून ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघात होम टू होम प्रचार करत आहेत. त्यांची प्रत्येक मतदारसंघात एक एक फेरी पूर्ण झाली आहे.

आता त्यांना महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांच्या प्रचाराला जावे लागणार असल्याने साताऱ्याकडे त्यांचे थोड दुर्लक्ष होईल. पण, ही कसर राष्ट्रवादीचे चार आमदार व प्रमुख कार्यकर्त्यांना भरून काढावी लागणार आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना जिल्ह्यातील पक्षाच्या स्थानिक आमदारांकडून सुरवातीला विरोध झाला, त्यानंतर त्यांचे मनोमिलन झाले. पण, जिल्ह्याच्या बाहेर संपूर्ण राज्यभर ‘क्रेझ’ असल्यामुळे त्यांना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी व्हावे लागणार आहे. 

Web Title: Loksabha Election 2019 Udayanraje Bhosale Style Politics Invitation Publicity