Loksabha 2019 : राज्यातील सरकारकडून दडपशाही : चित्रा वाघ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

अंत्योदय योजनेच्या रेशनींगच्या साखरेचे दर वाढवले असून सरकारने गरीबांना लुबाडण्याचे काम केले आहे. तरीही स्वत:ला चौकीदार कसे म्हणवतात, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. 

लोकसभा 2019
माढा (जि. सोलापूर) : केंद्र सरकारने गरीबांना लुबाडण्याचे काम केले असून राज्यातील सरकार दडपशाहीचे राजकारण करत असल्याची घणाघाती टिका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी माढा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ माढयातील महिला मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंगळवारी (ता. 2) केली.

यावेळी वाघ म्हणाल्या, की महाराष्ट्रात दिवसाला बारा मुली - महिलांवर बलात्कार होत आहेत. छेडछाडीच्या घटनांमधे वाढ झालेली आहे. त्यामुळे हे महिलांच्या सुरक्षेचे चौकीदार असतील तर महिलांनी बाहेरच पडायला नको आहे. असले चौकीदार आम्हाला नको.

पवारसाहेबांची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची काळजी करा. स्वतःच्या पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळींवर काय वेळ आली आहे पहा. पवारांच्या कुटुंबापेक्षा देशाची काळजी करा. देशात बेरोजगारी वाढली आहे. नोटाबंदीनंतर अजूनही देश सावरला नाही.

उज्ज्वला योजनेबाबत त्या म्हणाल्या, की केवळ गॅसचे कनेक्शन देऊन जेवण बनत नाही. त्याला गॅस सिलिंडर हवे आहे. गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. उज्ज्वला गॅस धारकांना स्वस्तात गॅस सिलिंडर द्यायला हवे आहे. एकीकडे अनेकांनी गॅस सबसिडी सोडूनही उज्ज्वला योजनेतील गॅसधारकांना स्वस्तात सिलिंडर सरकार देत नाही. अंत्योदय योजनेच्या रेशनींगच्या साखरेचे दर वाढवले असून सरकारने गरीबांना लुबाडण्याचे काम केले आहे. तरीही स्वत:ला चौकीदार कसे म्हणवतात, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.  

राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून विरोधकांच्या चौकशी व कारवाईच्या गर्भित धमकीबाबत वाघ म्हणाल्या की हे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम आहे. दडपशाहीचे राजकारण सुरू असून संविधानाला पायदळी तुडवण्याचे काम सुरू असून सरकारला पराभव समोर दिसू लागल्याने हे सुरू असल्याचे वाघ म्हणाल्या.

Web Title: Repression by the state government says chitra wagh