Loksabha 2019: माढ्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते दहा वर्षानंतर एकत्र

भारत नागणे
मंगळवार, 2 एप्रिल 2019

- सोलापूर जिल्ह्यातील तीन समाविचारी मातब्बर नेत्यांची भेट
- राजकीय समिकरणे वेगाने बदलण्यास सुरवात
- तीनही नेत्यांच्या एकत्रित भेटीनंतर जिल्ह्यात चर्चांना उधाण

पंढरपूर : राजकारण ही  एक अशी गोष्ट आहे की, कधी जवळचे मित्र आणि नातेवाईक दूर जातात तर काही वेळा दुरावलेले जिवलग मित्र, नातेनाईक पुन्हा जोडले जातात. असाच काहीसा सोलापूरच्या राजकारणात सुखद प्रसंग घडला आहे. जिल्ह्यातील तीन समाविचारी मातब्बर नेत्यांच्या एकत्रित भेटीमुळे जिल्ह्यातील  राजकीय समिकरणे वेगाने बदलू लागली आहेत. या तीनही नेत्यांच्या एकत्रित भेटीनंतर जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या दहा वर्षामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना एकमेकांपासून दूर गेेलेले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते पाटील, पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक आणि वर्षानुवर्षापासून दोघांनाही साथ देणारे शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख हे लोकसभा निवडणूुकीच्या निमित्ताने आज एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. सांगोल्यात आमदार देशमुख यांच्या घरी हे तीघे मित्र आणि राजकारणातील मातब्बर अनेक वर्षानंतर एकत्रित भेटले. या दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यताही या निमित्ताने वर्तवली जाऊ लागली आहे.

2009 पासून सुधाकर परिचारक आणि मोहिते पाटील यांच्यात राजकीय दुरावा निर्माण झाला होता. या दोघांमध्ये  गेल्या दहा वर्षापासून राजकीय संघर्ष मागील पंधरा दिवसांपर्यंत कायम होता. दरम्यान,  मोहिते पाटीलांनी  भाजपात प्रवेश केल्यानंतर एकमेकांपासून दुरावलेले  मोहिते-परिचारक पुन्हा एकत्रित आल्याने  जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलू लागली आहे.

2014 साली राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर परिचारकांनी सत्ताधारी भाजपा सोबत घरोबा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिचारकांना  वेळोवेळी राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न केला. त्यातून भाजप आणि परिचारकांचे राजकीय नाते अधिक घट्ट झाले. 2014 साली पंढरपुरातून प्रशांत परिचारकांचा विधानसभेला झालेला पराभाव धूऊन काढण्यासाठी भाजपाने विधानपरिषदेच्या निवडणुकीत परिचारकांना मोठी ताकद दिली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत परिचारकांनीही भाजपाला साथ दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक उलाथापालथी झाल्या. भाजपा सोबत असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी ऐनवेळी भाजपाची साथ सोडत राष्ट्रवादीचीसोबत केली. त्यानंतर जिल्ह्यातील समविचारी आघाडीमध्ये फूट पडली. संजय शिंदेंचा अपवाद वगळता अन्य सर्वच नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपाने समविचारी आघाडीतील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. निंबाळकरांच्या उमेदवारीला मोहिते पाटलांनाही हिरवा कंदील दाखवला. भाजपने माढ्याची जबाबदारी मोहिते पाटील आणि परिचारकांवर सोपवली आहे. माढ्य़ाची निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे मोहिते परिचारकांसह भाजपचे नेते हातातहात घालून कामाला लागले आहेत.

निवडणुक प्रचारात कोणताही राजकीय कटुता राहूनये म्हणून शनिवारी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पंढरपुरातील परिचारकांच्या मेळाव्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी  मोहिते परिचारकांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. झालं गेलं विसरुन काम करुया असं जाहीर आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यानंतर सोमवारी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी माजी आमदार सुधाकर परिचारकांची घऱी येऊन भेट घेतली. दहा वर्षानंतर प्रथमच मोहिते परिचारकांची गळाभेट झाली. भेटीनंतर मोहिते आणि परिचारकांची सुमारे दीड तास बंदखोलीत चर्चा झाली. चर्चेनंतर दोघांनी अनेक वर्षानंतर माध्यमांना हसतमुख पोज दिली.

अंग झटकून कामाला लागलेल्या मोहिते परिचाकांनी आज लागलीच आपल्या जीवाभावाचे मित्र असलेल्या शेकापचे ज्येष्ट नेते आमदार गणपतराव देशमुखांची घरी जावून भेट घेतली. भेटी दरम्यान तिघांनी जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. यावेळी भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनीही आमदार गणपतराव देशमुखांचे आशिर्वाद घेतले. यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील हे अवर्जून उपस्थित होते.

जिल्ह्यातील दिग्ज आणि मातब्बर तिघा नेत्यांच्या एकत्रित भेटीमुळे राजकाणात एकच खळबळ उडाली आहे. मागील अनेक वर्षापासून एका विचाराने विकासाचे राजकारण करणार्या मोहिते,परिचारक आणि देशमुखांच्या भेटीनंतर कोणत्या  राजकीय घडामोड़ी घडणार याकडेच जिल्हयाचे  लक्ष लागले आहे.

Web Title: Top Leaders from Solapur to work together for Loksabha elections in Madha Constituency