उदयनराजे... भाजपमधून लढा! 

उदयनराजे... भाजपमधून लढा! 

सातारा -  राष्ट्रवादीचे आमदार व कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत आपले काम करण्याच्या मनःस्थितीत नाहीत, त्यामुळे धोका पत्करण्याऐवजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढवावी, असा सूर आज त्यांच्या समर्थकांच्या बैठकीत निघाला. उदयनराजे जो निर्णय घेतील, तो मान्य करून त्यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे जिद्दीने काम करू, असा शब्द सर्वांनी दिला. त्यामुळे उदयनराजे भोसले कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे. अद्याप त्यांची उमेदवारी राष्ट्रवादीने जाहीर केलेली नाही. उमेदवारी जाहीर झाली, तरी उदयनराजेंच्या विरोधात काम होण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात व्यक्‍त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सातारा लोकसभा मतदारसंघात खल सुरू आहे. या सर्व घटना, घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील उदयनराजे समर्थकांची महत्त्वपूर्ण बैठक येथे झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, दत्ता बनकर, संग्राम बर्गे, जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख, गीतांजली कदम, बाळासाहेब गोसावी, रंजना रावत, सुनील सावंत, संदीप शिंदे, नगरसेवक किशोर शिंदे, विजय यादव, जितेंद्र खानविलकर, विकास शिंदे, हणमंतराव पवार, विजय नायकवडी, चंद्रकांत कारभारी, महेश गुरव आदी उपस्थित होते. 

सुरवातीला प्रत्येकाने आपापली भूमिका मांडली. प्रारंभी काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊनच लोकसभेला सामोरे गेले पाहिजे, असे मत मांडले. राष्ट्रवादीमधीलच काही जण सध्या उदयनराजेंना विरोध करत आहेत, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला; सध्या त्यांच्या उमेवारीला पक्षातूनच विरोध केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांचे कार्यकर्ते उदयनराजेंचे काम करतील याची खात्री वाटत नाही. मागील वाढदिवसाच्या कार्यक्रमापासून राष्ट्रवादीच्या आमदारांनी विरोधात भूमिका घेतली आहे. कऱ्हाडमधील वीरस्मरण कार्यक्रमास राष्ट्रवादीचा एकही आमदार उपस्थित राहिला नाही. यावरून सर्व काही ते समजून घेऊन उदयनराजेंनी आपली भूमिका ठरवावी. सध्या देशात व राज्यात भाजपचे वारे आहे. भाजपने विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला विविध लाभ देण्याचे काम केले आहे, तसेच जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातही भाजपने चांगली बांधणी केली असून, प्रत्येक ठिकाणी सक्षम उमेदवार देण्याची तयारी केली आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणूक भाजपला सोपी झाली आहे. त्यामुळे उदयनराजेंनी भाजपमधून निवडणूक लढण्याचा विचार करावा. राष्ट्रवादीत त्यांच्याविषयी असलेली नाराजी लक्षात घेता आगामी काळात धोका पत्करू नये, अशी अपेक्षा बहुतांश समर्थकांनी व्यक्‍त केली. लोकसभा निवडणुकीबाबत उदयनराजे भोसले जो निर्णय घेतील तो मान्य करून त्यांच्या पाठीशी सर्व जण ताकदीने उभे राहू. त्यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी जिद्दीने काम करू, अशी ग्वाही सर्वांनी दिली. 

उदयनराजे शांत... समर्थक आक्रमक! 
गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी भाजपचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी गावागावांमध्ये बैठका घेण्यास सुरवात केली आहे. गावांमध्ये राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते मला मदत करतील, असे श्री. पाटील बिनधास्तपणे बोलत आहेत. या पार्श्‍वभूमीवर उदयनराजे हे स्वत: शांत असले तरी समर्थक मात्र, आता आक्रमक झाले आहेत. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com