Election Results ​: बारामती मतदार संघाची मतमोजणी सुरू

baramati_kule_sule.jpg
baramati_kule_sule.jpg

बारामती : देशाचे सर्वाधिक लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, येत्या काही तासातच कोण खासदार होणार याचा निकाल सर्वांसमोर येणार आहे. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांचन कुल यांच्यात प्रमुख लढत होत आहे.

गेल्या दोन वेळेस सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या होत्या. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रासपचे महादेव जानकर यांनी सुळे यांना कडवी लढत दिली होती. 2014 ला सुळे यांना 5, 21, 562 तर जानकर यांना 4, 51, 843 मते मिळाली होती. त्यावेळी जवळपास 69, 719 हजाराच्या मताधिक्क्याने सुळे विजयी झाल्या होत्या.बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला, दौंड, पुरंदर या मतदारसंघात सुळे या पिछाडीवर होत्या. मात्र बारामती, इंदापूर व भोर या तीन विधानसभा मतदार संघांनी सुळे यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला होता.

खडकवासला विधानसभा मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष :
खडकवासला मतदार संघात बहुतांश भाग हा शहरातील येतो. मागील वेळी या मतदार संघात सुळे यांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागली होती. 2014 ला जानकर यांना तब्बल 28, 127 मतांची आघाडी होती. जानकर  यांना 98, 729 मते तर सुळे यांना 70, 602 मते मिळाली होती. जानकर यांनी रासपच्या चिन्हावर न लढता भाजपचे कमळ हे चिन्ह घेतले असते तर कदाचित खडकवासला मतदार संघाने इतिहास घडविला असता, अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती. आता मात्र खरच कमळ चिन्ह आहे. दुसरे म्हणजे यावेळची खडकवासला मतदार संघाची मतदान टक्केवारी देखील यावेळी वाढली आहे. ही वाढलेली टक्केवारी कोणाच्या पारड्यात जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पुरंदर यंदा काय करणार 
मागील वेळी पुरंदर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला
मोठा फटका बसला होता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विखुरले गेले होते. तसेच विजय शिवतारे यांनी जानकर यांच्यासाठी ताकद पणाला लावली होती. कॉंग्रेसचे संजय जगताप यांचे देखील राष्ट्रवादीशी काही मधुर संबंध नव्हते. त्यामुळे सुळे पुरंदरमधून 5, 666 मतांनी मागे पडल्या होत्या. सुळे यांना 72, 431 मते तर जानकार यांना 78, 097 मते मिळाली होती. सध्या तशी परिस्तिथी दिसत नाही. कारण संजय जगताप यांनी पुढची विधानसभा लक्षात घेऊन खूप जोमाने सुळे यांचे काम केले आहे. मंत्री शिवतारे यांनी कुल यांच्यासाठी ताकत पणाला लावली आहे. आता या दोघांपैकी कोण यशस्वी ठरणार हे थोड्याच वेळात कळेल.

दौंडचा झटका यंदाही राहणार का?
मागील निवडणुकीत दौंड तालुक्याने राष्ट्रवादीला चांगलाच झटका दिला होता. सुळे या मतदार संघातुन 25, 548 मतांनी पिछाडीवर होत्या. जानकर  यांना 82, 837 तर सुळे यांनी 57, 229 मते घेतली होती. यावेळी मात्र भाजपचा स्थानिक म्हणजे याच विधानसभा मतदार संघातील कुल या उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना निश्चितच याचा फायदा आहे. आता त्या दौंडमधून त्या किती लीड घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भोर, इंदापुरचा कौल कोणाला :
भोर विधानसभा मतदार संघात सुळे यांना मागील वेळी 16, 885 मतांची आघाडी होती. तर इंदापुरात 21, 693 मतांनी सुळे जानकर यांच्या पुढे होत्या. आता कुल की सुळे कोणाला भोर व इंदापुरात आघाडी मिळणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बारामती निर्णायक ठरणार का? 
बारामती मतदार संघानेच सुळे यांचा विजय सोपा केला होता. जानकर या मतदार संघातून 90, 628 मतांनी पिछाडीवर होते. सुळे यांना 1, 42, 628 तर जानकर यांनी 52, 000 मते घेतली होती. यंदाही बारामतीच निर्णायक ठरणार का हाच प्रश्न थोड्याच कालावधीत निकाली निघेल. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील जवळपास डझनभर मंत्र्यांनी बारामती मतदारसंघात सभा घेत सुळे यांच्या विरुद्ध वातावरण निर्मिती करण्याचा जोरदार प्रयत्न केला. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत तळ ठोकत पवार कुटुंबियांना जाहीरपणे आव्हान देण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर भाजपने इतकी ताकद लावून सुळे या विजयी होतात की कुल चमत्कार घडविण्यात यशस्वी होतात याकडे आता देशाचे लक्ष लागून राहिले आहे. थोड्याच वेळात बारामतीचा खासदार कोण हे निश्चित होईल.
[

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com