Loksabha 2019  :  जिथे जावे तिथे मतदानाचीच चर्चा

Loksabha 2019  :  जिथे जावे तिथे मतदानाचीच चर्चा

पिंपरी - सोमवारची सकाळ मतदानाच्या चर्चेनेच सुरू झाली. जिथे जावे-तिथे निवडणूक आणि मतदानाचीच चर्चा ऐकायला मिळाली. बातमीदार म्हणून शहरातील निवडणूक केंद्रांचा आढावा घेताना कुठे गमती-जमती ऐकायला मिळाल्या; तर कुठे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याबाबतची जागृती.

शहराच्या पूर्वेकडील चऱ्होली उपनगर. सकाळी साडेसातच्या सुमारास गावठाणातील चौकात पोचलो. त्याच्या बाजूलाच महापालिका शाळेत मतदान केंद्र होते. परिसरातील सर्वच दुकाने बंद होती. जागोजागी पोलिस उभे होते. दोनशे मीटर अंतरात वाहने उभी करण्यास मनाई करत होते. येथून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर पठारे मळा शाळेतील केंद्र होते. गावठाणापासून पाचशे मीटरपर्यंत पक्का रस्ता व तेथून पुढे अर्धा-पाऊण किलोमीटर कच्चा रस्ता लागला. नंतर ६१ मीटर रुंद एअरपोर्ट रोड उभारणीचे काम सुरू आहे. त्यालगत केंद्र होते. सुमारे साडेचार हजार मतदार असलेल्या प्राइड सोसायटीतील नागरिकांनी येथे मतदान केले. बहुतांश मतदार उच्चशिक्षित व इंग्रजीत बोलत होते. चोविसावाडी, वडमुखवाडी, साईमंदिर परिसरातही उत्साह दिसला. काळजे मळा मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.

मतदार चिठ्ठीचा आधार...
मोशी येथील चार मतदान केंद्रांवर दुपारी एकच्या सुमारास रांगा होत्या. केंद्रांपासून शंभर मीटरच्या बाहेर राजकीय पक्षांचे मतदार स्लीप (चिठ्ठी) वाटप केंद्र होते. ई-वोटर स्लीप यंत्रामुळे ‘फक्त नाव सांगून मतदार स्लीप’ मिळत होती. यामुळे नेहमीप्रमाणे ‘यादीत नाव शोधून चिठ्ठी तयार करणार कार्यकर्ता’ असे चित्र नव्हते. मतदान केंद्राच्या आवारात निवडणूक आयोगाचे कर्मचारी ‘वोटर स्लीप’ देत होते. मतदाराची स्वाक्षरी व संपर्क क्रमांक त्यांच्याकडील पुस्तिकेत घेत होते.

धावाधाव करू नका...
‘जास्त धावाधाव करू नका. जमेल तेवढं काम करा. उगाच वाद ओढवून घेऊ नका,’ अशा सूचना एका राजकीय पक्षाच्या शहरातील नेत्याने कार्यकर्त्यांना दिल्या. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक त्या नेत्याने घेतली. त्यामुळे आम्ही रिलॅक्‍स झालो, असे एका पदाधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

...त्यांनी पैसे वाटले?
‘‘आमच्या समोर विरोधकांनी पैसे वाटले. पण, काय बोलणार? ते आपल्याच भागात राहणारे. नेहमीच समोरासमोर येणार. रोज भेटणार. कशाला वाईटपणा घ्यायचा? कारण निवडून येईल तो खासदार होऊन निघून जाईन. पैसे वाटणारे आणि आपण इथेच राहू. आपलं गावकीचं काम. कोण तक्रार करणार? जाऊ द्या.’’ अशी मनमोकळी भावना एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.

यादीतील घोळ कायम
पिंपरी ः यादीतील घोळामुळे शहराच्या विविध भागांत अनेक मतदारांचा गोंधळ उडाला. त्यामुळे अनेकांना आपला हक्क बजावता आला नाही. 

काळेवाडीतील ज्योतिबानगर परिसरात एकाच कुटुंबातील काहींची नावे थेरगाव-कीर्तीनगरमधील न्यू इंग्लिश स्कूल मतदान केंद्रात आले. त्यांना केंद्र सापडले नसल्याने त्यांनी मतदान केले नाही. पिंपरीतील डेअरी फार्म येथील रहिवासी रवींद्र परदेशी व त्यांची आई नीलकमल परदेशी यांचे मतदानासाठी महात्मा फुले शाळेत नाव असायचे. मात्र, या वेळी रवींद्र यांचे नाव निगडी प्राधिकरणात तर नीलकमल यांचे नावच मतदान यादीत सापडले नसल्याने त्या निराश होऊन घरी परतल्या. अशीच परिस्थिती अनेकांची झाली.  

निवडणूक आयोगाच्या वतीने बीएलओ मतदारांना घरोघरी जाऊन मतदार स्लिपा व ओळखपत्र देतात. मात्र, या वेळी अनेक मतदारांना स्लिपा व ओळखपत्र मिळालेच नाहीत. त्यांचे गठ्ठे रहाटणी, थेरगाव व पिंपरीगावातील विविध मतदान केंद्रावर पाहायला मिळाले. स्लिपांशिवाय मतदानाची प्रक्रिया होत नसल्याचे निवडणूक कर्मचाऱ्यांकडून सांगितल्याने अनेक मतदार आपल्या नावाच्या स्लिपा शोधत होते. याबाबत मतदान नोंदणी कर्मचारी म्हणाले, की मतदान ओळखपत्र व स्लिपांवर पूर्ण पत्ता येत नाही. त्यामुळे त्यांचे पत्ते शोधणे कठीण होते. अशा मतदारांची संख्या मोठी असून त्यांची ओळखपत्रे आमच्याकडेच पडून आहेत.

‘दानवे पट्टीचे पहिलवान’
मोशी-चिखली रस्त्यावर एक वारकरी उभे होते. त्यांनी थांबण्याचा इशारा केला. दशमी असल्याने त्यांना देहूला जायचे होते आणि मला याच मार्गावरील चिखली-तळवडेतील निवडणूक वातावरण पाहण्यासाठी जायचे होते. वारकरी आजोबांना दुचाकीवर घेऊन निघालो. त्यांच्याशी संवाद साधला. बोलता बोलता विषय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व भोकरदन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविलेले रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत पोचला. कारण, ते वारकरी दानवे यांच्या जालना जिल्ह्यातील होते. त्यांना म्हणालो, ‘‘आज मतदान आहे. तुम्ही केले का?’’ ते म्हणाले, ‘‘आमचं मतदान २३ तारखेलाच झालंय. ते करूनच चैत्र वारीला निघालो.’’ ‘‘कसं काय हो दानवेंच? माणूस म्हणून चांगले आहेत का ते?’’ माझे प्रश्‍न ऐकून वारकरी म्हणाले, ‘‘त्यांच्या वडिलांच्या काळात ते खूप चांगले होते. आता पैसा आलायं. पहिल्यासारखे फारसे राहिले नाहीत.’’ ‘‘ते निवडून येतील?’’ ‘‘येतील. ते पट्टीचे पहिलवान आहेत. समोरचा पहेलवान शड्डू ठोकतोय. दंड थोपटतो. दानवे मात्र गप्प उभे राहतात आणि गप्पकन पाय पकडून विरोधकाला चितपट करता.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com