Loksabha 2019 : बापट, कुल यांचे अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

डोक्‍यावर ‘मैं भी चौकीदार’ असे लिहिलेल्या टोप्या, गळ्यात भाजप, शिवसेना, रिपाइंचे उपरणे, हातात नरेंद्र मोदी यांचे फोटो घेऊन महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोशामध्ये ही मिरवणूक काढली.

पुणे - महायुती झिंदाबाद... पुण्याची ताकद गिरीश बापट... गिरीश बापट यांचा विजय असो... अशा घोषणा देत ढोल-ताशा, हलगी, बॅंडच्या तालावर नाचत भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांची मंगळवारी जंगी मिरवणूक काढली. दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. बापट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात, तर कुल यांनी विधान भवन येथे अर्ज भरला. 

ग्रामदैवत कसबा गणपतीला वंदन करून मिरवणुकीला सुरवात करण्यात आली. कसबा गणपती ते नरपतगीर चौक या दरम्यान रांगोळ्या काढल्या होत्या. बापट आणि कुल यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणी फुलांचे हार घालून त्यांना शुभेच्छा दिल्या जात होत्या. 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री विजय शिवतारे, दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळ, संजय काकडे, शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसंग्रामचे विनायक मेटे, आमदार मेधा कुलकर्णी, विजय काळे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, रिपाइंचे शहराध्यक्ष अशोक कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.

.. आम्ही साहेबांचे वाघ  
मिरवणुकीमध्ये रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी गाणी सादर केली. ‘‘आम्ही बापटसाहेबांचे वाघ... जाणार नाही कुणाच्या मागे’’ या गाण्याला कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. 

सेल्फीसाठी गडबड घाई 
डोक्‍यावर ‘मैं भी चौकीदार’ असे लिहिलेल्या टोप्या, गळ्यात भाजप, शिवसेना, रिपाइंचे उपरणे, हातात नरेंद्र मोदी यांचे फोटो घेऊन महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोशामध्ये ही मिरवणूक काढली. या वेळी महिलांसह कार्यकर्त्या ग्रुप सेल्फी काढण्यात दंग झाल्या होत्या. मिरवणुकीत चंद्रकांत पाटील, जानकर हे नेते दाखल झाल्यानंतरही त्यांच्यासोबतही त्यांनी सेल्फी काढले.

Web Title: Girish Bapat Kanchan kul application is filed