Loksabha 2019 : निवडून येण्याचा मला विश्‍वास - मोहन जोशी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

 तूर गैरव्यवहारात आरोप झालेले पालकमंत्री गिरीश बापट हे भ्रष्टाचारी आहेत. अशा भ्रष्टाचारी मंत्र्याला पुणेकर कदापी निवडून देणार नाहीत. त्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे, असा विश्‍वास लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी गुरुवारी व्यक्त केला. 

पुणे - तूर गैरव्यवहारात आरोप झालेले पालकमंत्री गिरीश बापट हे भ्रष्टाचारी आहेत. अशा भ्रष्टाचारी मंत्र्याला पुणेकर कदापी निवडून देणार नाहीत. त्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे, असा विश्‍वास लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी गुरुवारी व्यक्त केला. 

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जोशी यांनी गुरुवारी "सकाळ' कार्यालयास भेट दिली. "फेसबुक लाइव्ह'च्या माध्यमातून संवाद साधताना विजयाच्या विश्‍वासाबरोबरच प्रतिस्पर्धी उमेदवार बापट यांच्यावर त्यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले, ""पुण्याचे पालकमंत्री म्हणून बापट अपयशी ठरले आहेत. पुण्याचे अनेक प्रश्‍न गेल्या साडेचार वर्षात अडकून पडले आहेत. एकही महत्त्वाचा विषय त्यांना मार्गी लावता आला नाही. पुण्यातील मेट्रो ही केवळ बापट यांच्या अपयशी नेतृत्वामुळेच गतीने पूर्णत्वास जाऊ शकली नाही.'' 

उमेदवारी जाहीर होण्यास काहीसा उशीर झाला असला तरी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे माझी उमेदवारी पुणेकरांपर्यंत पोचली आहे. प्रचारासाठी उरलेल्या दिवसात पुण्यातील सर्व भागांत कोपरा सभा आणि छोट्या मेळाव्यांच्या माध्यमातून पुणेकरांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हे प्रचार सभा आणि रोड शो यासाठी पुण्यात येणार आहेत. माझ्या पक्षातील लोकसभेचे सारे इच्छुक आणि पदाधिकारी एकदिलाने प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे 23 मे रोजी पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून मीच संसदेत जाणार आहे. पुण्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांतून केवळ कॉंग्रेसच काय भाजपच्याही आमदारांचा मला पाठिंबा आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये कार्यकर्त्यांशी माझा गेली 40 वर्षांपासून संपर्क आहे. त्यामुळे निवडून येण्यात मला कोणतीही अडचण वाटत नाही, असा विश्‍वास जोशी यांनी व्यक्त केला. 

Web Title: I believe to be elected says Mohan Joshi