Loksabha 2019 : तोगडियांना काळे फासणारे हेच ते मोहन जोशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

- पुणे लोकसभा मतदार संघातून मोहन जोशी यांना पुन्हा उतरविले रिंगणात
- 1999 च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात दोन नंबरची मते
- यंदा भाजप- कॉंग्रेस अशा सरळ लढतीत जोशी दिल्ली गाठणार का, औसुक्‍याचा विषय

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातून माजी आमदार आणि पक्षाचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणाऱ्या मोहन जोशी यांना कॉंग्रेसने पुन्हा एकदा रिंगणात उतरविले आहे. कॉंग्रेसमध्ये फूट पडली असताना 1999 मध्ये पक्षाच्या आदेशावरून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जोशी यांनी दोन नंबरची मते घेतली होती. यंदा मात्र भाजप- कॉंग्रेस अशा सरळ लढतीत जोशी दिल्ली गाठणार का, औसुक्‍याचा विषय झाला आहे. 

जोशी यांनी आपल्या राजकीय कारर्किर्दीला युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून 1972 पासून सुरवात केली. खासदार सुरेश कलमाडी यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्याच काळात त्यांना पक्षाचे शहराध्यपद देखील मिळाले. कलमाडी यांनी कॉंग्रेसला सोडल्यानंतर पुणे विकास आघाडी काढली. मात्र जोशी यांनी कलमाडी यांच्याबरोबर न जाता कॉंग्रेसमध्ये राहणे पसंत केले. तेथून जोशी यांचे पक्षातील स्थान अधिकच बळकट झाले. त्याची दखल घेऊन जोशी यांना पक्षाकडून 2008 मध्ये विधानपरिषदेवर पाठविण्यात आले. 

पुण्याच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध संस्थांशी ते संबंधित आहेत. कुटूंबाच्या हालकीच्या परिस्थीतीमुळे दहावी नंतर त्यांच्या शिक्षणात खंड पडला. त्यामुळे मीलमध्ये त्यांना कामगार म्हणून काम करावे लागले. 1968 मध्ये स्थानिक मराठी दैनिकात बातमीदार म्हणून त्यांनी काम केले. त्यांनतर युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या जोशी यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत प्रदेश कॉंग्रेसचे माजी सरचिटणीस, महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष, युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषविली. शहराध्यक्ष असताना 1997 ते 2004 या काळावधीत त्यांनी पक्षातर्फे विविध उपक्रम राबवून राबविले.

शहराध्यक्षपदाच्या कार्यकाळात विश्‍व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांना काळे फासण्याचा असो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन यांना विमानतळावर घेराव घालण्याचे आंदोलन, हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला वळण देणारे ठरले. या दोन्ही आंदोलनांमुळे त्यांचे नाव देशभर पोचले.

राजस्थान,छत्तीसगड, बिहार, झारखंड, कर्नाटक, गुजराथ, मध्यप्रदेश येथील निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे निरीक्षक म्हणूनही समर्थपणे जबाबदारी सांभाळली. 
 

Web Title: Information about pune loksabha candidate Mohan Joshi