Loksabha 2019 : बस्स! आता फक्त २१ दिवस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

माजी आमदार मोहन जोशी यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मतदानास बावीस दिवसांचा कालावधी राहिला आहे. या कालावधीत प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचे आव्हान काँग्रेस आघाडीपुढे असणार आहे. हे आव्हान आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते कसे पेलणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पुणे - उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये निर्माण झालेला गोंधळ अखेर मिटला. माजी आमदार मोहन जोशी यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मतदानास बावीस दिवसांचा कालावधी राहिला आहे. या कालावधीत प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचे आव्हान काँग्रेस आघाडीपुढे असणार आहे. हे आव्हान आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते कसे पेलणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार, हा शहरात औत्सुक्‍याचा विषय झाला होता. मोहन जोशी, अरविंद शिंदे, अभय छाजेड यांच्यासह प्रवीण गायकवाड यांचेदेखील नाव चर्चेत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागली होती. कार्यकर्त्यांबरोबरच शहर काँग्रेसमधील नेतेदेखील प्रतीक्षा करून कंटाळले होते. कार्यकर्त्यांमधील जोश कमी होऊ नये, यासाठी शहर काँग्रेसने पुढाकार घेत प्रचाराला सुरवात केली. परंतु, उमेदवार ठरत नसल्यामुळे मतदारांना उत्तर काय देणार, अशी अवस्था झाली होती. उमेदवारी भरण्याची अंतिम मुदत दोन दिवसांवर येऊन ठेपली, तरी पक्षाकडून उमेदवार निश्‍चित होत नसल्याने शहरात हा चेष्टेचा विषय झाला होता. असे असताना काल रात्री पक्षाकडून पुण्यातील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली.

पुणे शहरासाठी २३ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यास अवघे बावीस दिवस शिल्लक राहिले आहेत. या कालावधीत मित्रपक्षाला बरोबर घेऊन मतदारांपर्यंत पोचण्याचे आव्हान पक्षापुढे उभे राहिले आहे. हे आव्हान पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते कसे पेलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी रात्रीचा दिवस कार्यकर्त्यांना करावा लागणार आहे.

Web Title: Loksabha 2019 Now only 21 days remaining