Loksabha 2019 : चहावाल्यांना ‘अच्छे दिन’ (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

माझ्या दुकानाच्या परिसरात काही पक्षांची कार्यालये आहेत. तसेच भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचे घर याच परिसरात आहे. त्यांच्याबरोबर असलेले अनेक कार्यकर्ते सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी चहा प्यायला येतात. निवडणुकीच्या प्रकारकामांमुळे व्यवसायात वाढ झाली आहे. 
- भारत दवे, चहा विक्रेता  

पुणे - ‘चायवाले’ नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार की सत्तांतर होणार, हे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर जाहीर होईलच; पण प्रचाराच्या या रणधुमाळीमुळे ‘रिअल’ चायवाल्यांना मात्र ‘अच्छे दिन’ आले आहेत.

पुण्यातून भारतीय जनता पक्षासह काँग्रेसचा उमेदवार निश्‍चित झाला. दोन्ही पक्षांच्या प्रचाराला सुरवात झाली आहे. त्यामुळे जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या सन्मान हॉटेलमधील भाजपच्या कार्यालयात आणि महानगरपालिकेजवळ असलेल्या काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांचा राबता वाढला आहे. प्रचार आणि इतर अनेक बाबींच्या नियोजनात व्यस्त असलेले कार्यकर्ते व नेते गरमा-गरम चहा पिऊन कामे हातावेगळी करीत आहेत.

तसेच गाठीभेटी, चर्चा, बैठकांसाठी दोन्ही पक्षांच्या कार्यालयात नेते, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे. प्रचाराची रणनीती आणि दिवसभराचे नियोजन पार पाडीत असताना चाय पे चर्चा होत असल्याने दोन्ही कार्यालयात चहाच्या ऑर्डर प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे कार्यालय परिसरातील चहावाल्यांसह इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांची कमाई वाढली आहे. इतर दिवशी २ ते अडीच हजार रुपयांची उलाढाल होत असलेल्या चायटपरींची रोजची कमाई जवळपास दुप्पट झाली आहे. त्यामुळे प्रचाराच्या रणधुमाळीत या ‘रिअल’ चायवाल्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. 

असेच काहीसे चित्र शहरातील विविध पक्षांच्या व त्यांच्या नगरसेवकांच्या कार्यालयात आहे. त्यामुळे त्या परिसरात रोजीरोटीसाठी आलेल्या खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या टपरीचालकांचा व्यवसाय वाढला आहे. चहाबरोबर क्रीम रोल, विविध बिस्कीट, बनपाव यांचीही मागणी वाढल्याने विक्रेत्यांकडे या सर्व खाद्यपदार्थांचा स्टॉकदेखील वाढला आहे. १५ दिवसांपासून काँग्रेस भवनमध्ये ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

निवडणूक असल्याने नेतेमंडळीदेखील येत आहेत. त्यामुळे चहा आणि त्याबरोबर क्रीम रोल व वडापावच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती काँग्रेस भवन परिसरातील चहाच्या विक्रेत्यांनी दिली.

Web Title: Loksabha Election 2019 Acche Din Politics Teamaker