Loksabha 2019 : भाडोत्री कार्यकर्त्यांना ‘भाव’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

जाहीरनामा लोकांपर्यंत पोचवणे, पत्रके वाटणे, निमंत्रण देणे आणि कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज असते. मतदारसंघाचा आवाका आणि मोठी मतदारसंख्या यामुळे कार्यकर्त्यांची गरज पडते.
- एका पक्षाचा कार्यकर्ता

पुणे - लोकसभा मतदारसंघाची रचना, वाढलेले मतदार, प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान आणि प्रचारासाठीचा जेमतेम अवधी या कात्रीत सापडलेल्या पक्षांच्या उमेदवारांना आता मतदारांपर्यंत पोचताना नाकीनऊ आले आहेत. त्यावर उपाय म्हणून, पक्ष आणि उमेदवारांनी हक्काच्या कार्यकर्त्यांसोबतच भाडोत्री कार्यकर्त्यांना पसंती दिली आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांची मागणी वाढल्याने त्यांचा ‘भाव’ही प्रतिदिन सातशे रुपयांपर्यंत पोचला आहे. दरम्यान, अशा प्रकारे कार्यकर्ते कामाला लावले नसल्याचे प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे आणि बारामती मतदारसंघासाठी २३ एप्रिलला मतदान होणार आहे. सुमारे २० लाख मतदारांपर्यंत पोचण्यासाठी जेमतेम दोन आठवड्यांचा अवधी आहे. या काळात मतदारांपर्यंत पोचण्यासाठी प्रचार सभा, कोपरा सभा, पदयात्रांवर भर देण्यात आला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी हवी, मात्र कार्यकर्तेच अपुरे ठरत असल्याने उमेदवार आणि त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे. परंतु, प्रचारात मागे पडण्याच्या भीतीपोटी विशेषत: उमेदवारांकडून भाडोत्री कार्यकर्ते उभारण्याचा ‘ट्रेंड’ वाढला आहे. निवडणुकीच्या काळात सहजासहजी रोजगार मिळत असल्याने कार्यकर्तेही उपलब्ध होत आहेत.

कशासाठी -  किती पैसै
युवकांसाठी - ५००
दिवसभरासाठी  - ५०० ते ७००
घरोघरी भेटीसाठी -  ५००
पदयात्रेसाठी - ३००

Web Title: Loksabha Election 2019 Activists Rent Rate Politics