Loksabha 2019 : अभिनेता असलो तरी थापाड्या नाही - डॉ. अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

कोल्हेंच्या उमेदवारीने गाव एक झाले
िदलीप मोहिते म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीच्या काळात मतदारसंघाचा विकास झाला. मतदानाच्या दिवशी प्रत्येकाने डॉ. कोल्हे यांना मत देऊन लोकसभेत पाठवायचे आहे. वडगाव घेनंद गाव नेहमी निवडणुकीत दोन गटांत विभागले जाते. यंदा मात्र डॉ. कोल्हेंच्या उमेदवारीने गाव एक झाले, ही अमोल देणगी मिळाली. आता आपले अनमोल मत कोल्हे यांना देऊन संसदेत पाठवा.’

आळंदी - ‘शिरूर लोकसभा मतदारसंघात मागील पंधरा वर्षांत जे झाले नाही, ते मी पाच वर्षांत करणार आहे. अभिनेता संसदेत काय करणार, म्हणून माझ्यावर विरोधी उमेदवाराकडून टीका केली जाते. मी अभिनेता असलो, तरी थापा मारणारा सोंगाड्या नाही,’’ अशा शब्दांत डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

डॉ. कोल्हे यांनी रासे, भोसे, शेलपिंपळगाव आणि वडगाव घेनंद (ता. खेड) येथे प्रचार केला. त्या वेळी त्यांनी वरील टीका केली. या वेळी माजी आमदार दिलीप मोहिते, बाबा राक्षे, दीपाली काळे, निर्मला पानसरे, अरुण चौधरी, बाळाशेठ ठाकूर, राजाराम लोखंडे, बाबासाहेब ठाकूर, हृषीकेश पवार, ॲड. श्‍याम बवले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारात होते. डॉ. कोल्हे म्हणाले की, आढळराव पाटील सभांमधून माझ्यावर टीका करताना सांगतात की, ‘डॉ. कोल्हे अभिनेता असून, खासदार झाल्यावर ते तुम्हाला कुठे भेटणार?’ याचा अर्थ त्यांना खात्री झाली की, मी शंभर टक्के जिंकणार; अन्यथा त्यांनी असा सवाल केलाच नसता. दिलेला शब्द पाळलाच पाहिजे; अन्यथा शब्द देऊ नये. गेल्या पंधरा वर्षांत काहीच झाले नाही. जे यापूर्वी झाले नाही, ते मी करणार आहे. दिलेला शब्द पाळणारा मी आहे. छत्रपतींच्या या मावळ्याला एकदा संधी द्या, मतदारसंघाच्या विकासासाठी जिवाचे रान करीन.

Web Title: Loksabha Election 2019 Actor Amol Kolhe Politics