Loksabha 2019 : सूट-बूटवाल्यांचे सरकार - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

तरुणांनी राजकारणात यावे - पार्थ पवार
पत्रकारांशी बोलताना पार्थ पवार म्हणाले, ‘‘तरुणांनी राजकारणात यावे, असे वाटते. त्यामुळे तरुणांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्‍न समजून घेत आहे. कामगारांच्या प्रश्‍नांबद्दल दादांची (अजित पवार) आणि माझी मते एकच आहेत. माझ्यावर काहीजण वैयक्तिक टीका करीत आहेत. त्यांना ती करू द्या.’

पिंपरी - ‘भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या नातेवाइकांना भंगारमाल, कामगार पुरविण्याचे ठेके देण्यात येत आहेत. कंपन्यांमधून कामगारांना कमी केले जात आहे. मात्र, कामगारमंत्री केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. हे सरकार गरिबांचे नसून सूट-बूटवाल्याचे आहे,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. ३१) चिंचवड येथे केली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ वाल्हेकरवाडीत शिवक्रांती कामगार संघटनेने कामगार मेळावा आयोजित केला होता. त्या वेळी पवार बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, सरचिटणीस ॲड. विजय पाळेकर आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘मावळ लोकसभा मतदारसंघातील अनेक कारखाने बंद पडत आहेत. अनेक कंपन्यांचे काम तीनऐवजी एक-दोन शिफ्टवर आले आहे. सध्याचे सरकार मालकांच्या बाजूने निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील उद्योगपतींच्या १५ घराण्यांना साडेतीन लाख कोटी रुपयांची मदत सरकारने केली आहे. कंपन्या देशोधडीला लागून काहीजण परदेशात पळून गेले. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा कारभार सुरू आहे.’’

मतांसाठी भाजप समाजाच्या जाती-धर्मांचा उल्लेख करायचे. आता ते देवावरही घसरले आहेत. त्यांनी आधी शिक्षण, नोकरी असे प्रश्‍न सोडवावेत. महागाई कमी करावी. आमचे सरकार सत्तेत असताना घरगुती गॅस सिलिंडरचा भाव ३५० रुपये होता. तो आता ८५० रुपयांहून अधिक आहे.

नोटाबंदीमुळे देश आर्थिक अडचणीत आला. ज्यांना कागदाचे विमान बनविण्याचा अनुभव नाही. त्यांना लढाऊ विमान बनविण्याचे काम कसे काय देण्यात आले? ५५० कोटी रुपयांचे राफेल विमान १६०० कोटी रुपयांना कसे काय विकत घेतले? कायदा बदलण्याचे सूतोवाच काहीजण करत आहेत. देशातील लोकशाही अडचणीत येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका त्यांनी केली

ॲड. पाळेकर म्हणाले, ‘‘तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. ज्या कामगारांवर अन्याय होतो त्यांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी फास्टट्रॅक न्यायालये स्थापन करावीत. संघटनेचे सभासद कामगार आणि त्यांच्या मित्रांनी पार्थ पवार यांना निवडून द्यावे.’’ पुणे जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे यांनी आभार मानले.

अजित पवार यांचा उल्लेख जनरल डायर असा करण्यात आला होता. त्याबद्दल पार्थ म्हणाले, ‘‘या उल्लेखाला आमचे कायकर्तेच उत्तर देतील. चिंचवड परिसरात मला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’ 

जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांना, ‘तुम्ही विधानसभेचे उमेदवार म्हणून दिसणार का? असे विचारले असता ते म्हणाले, ‘‘मला राजकारणापेक्षा सामाजिक कार्याची आवड आहे. मी काय सामाजिक काम करतो, ते दाखविण्याचा मी प्रयत्न करीत नाही.’

Web Title: Loksabha Election 2019 Ajit Pawar Parth Pawar Politics