Loksabha 2019 : भोरमधील काँग्रेसचा सुळे यांना ‘हात’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीच्या धर्माचे पालन करून सुप्रिया सुळे यांना विजयी करणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. तसे आदेश काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

भोर - भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीच्या धर्माचे पालन करून सुप्रिया सुळे यांना विजयी करणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. तसे आदेश काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्याचेही त्यांनी नमूद केले. 

सोमवारी दुपारी येथील राजगड ज्ञानपीठाच्या आवारात भोर मतदारसंघातील भोर, वेल्हे व मुळशी तालुक्‍यातील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. थोपटे यांच्या या निर्णयामुळे भोरमधील सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. बारामती मतदारसंघातील इंदापूर व पुरंदर येथील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामध्ये आता भोर मतदारसंघातील भोर, वेल्हे व मुळशी तालुक्‍यांचाही समावेश झाला आहे. 

काँग्रेसच्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीसंबंधातील आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. परंतु त्यांची समजूत काढून वरिष्ठ पातळीवर झालेल्या आघाडीचा निर्णयाचा आम्ही आदर करणार असल्याचे थोपटे यांनी जाहीर केले. सुळे यांचा प्रचार एकत्रितपणे करण्याबाबत निर्णय वरिष्ठांशी चर्चा करून घेणार असल्याचेही थोपटे यांनी सांगितले.

Web Title: Loksabha Election 2019 Bhor Congress Supriya Sule Politics