Loksabha 2019 : ‘...अन्यथा भाजप कार्यकर्ते प्रचारात उतरणार नाहीत’

BJP
BJP

लोणावळा - लोणावळा नगर परिषदेत भाजपची काँग्रेसशी असलेली अभद्र युती तोडा, अन्यथा भाजप कार्यकर्ते प्रचारात उतरणार नाहीत, असा इशारा देणारे पत्र सध्या समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) व्हायरल झाल्याने लोणावळ्यात सध्या राजकीय चर्चा जोरदार रंगली आहे. भाजपचे कार्यकर्ते ॲड. अविनाश पवार यांनी शहराध्यक्ष बाबा शेट्टी यांना हे पत्र लिहिले आहे. मात्र बाबा शेट्टी यांना शहराध्यक्षपदावरून पायउतार केले गेल्याने हे पत्र कितपत गांभीर्याने घेतले जाते, याविषयी चर्चा आहे.

पवार यांनी यापूर्वी नगर परिषदेची निवडणूक लढविली होती. तर त्यांच्या पत्नी जान्हवी यांनी २०१६ मध्ये भाजपच्या तिकिटावर खंडाळा प्रभागातून निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा निसटत्या फरकाने पराभव झाला होता. या निवडणुकीनंतर शिवसेना बाजूला झाल्याने भाजपने काँग्रेसचा हात हातात घेतला आहे. त्यात स्वीकृत सदस्यांसाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिलेला शब्द न पाळल्याने काही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. सध्या लोकसभेचे वारे वाहत असल्याने ॲड. पवार यांचे पत्र चर्चेत आले आहे. 

भाजपच्या नेत्यांनी देशभरात काँग्रेसमुक्त भाजपचा नारा दिला आहे. लोणावळ्यात मात्र भाजपने काँग्रेसशी युती करत आपली विश्‍वासार्हता गमावली असल्याचे या पत्रात म्हटले आहे. गेल्या निवडणुकीत नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी पक्षाच्या विरोधात काम केले. त्यामुळे त्यांना बडतर्फ केले. त्यानंतर पुन्हा पक्षात घेतले. जर नगराध्यक्षाच पक्षाचा आदेश मानत नसतील, तर कार्यकर्त्यांना युतीचा प्रचार करा असे सांगण्याचा नैतिक अधिकार नाही, असा मुद्दा ॲड. पवार यांनी उपस्थित केला आहे. पक्षाची मलिन होत असलेली प्रतिमा, स्वीकृत सदस्य निवडीस दिलेली बगल अशा कारणांनी कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास भाजपला मोठ्या प्रमाणावर बंडखोरीला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, लोणावळ्यातील सर्व कार्यकर्ते भाजपबरोबरच असून, आमच्या दृष्टीने हा विषय संपला असल्याची प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com