Loksabha 2019 : भाजपचे नगरसेवक युती धर्म पाळणार - महेश लांडगे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

बैठकीपासून सेना पदाधिकारी दूर 
बैठकीसाठी सेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, शहरप्रमुख रोहिदास तापकीर, भाजपचे शहराध्यक्ष भागवत आवटे आणि पदाधिकारी मात्र चर्चेपासून दूर होते. केवळ नगरसेवकांना बरोबर घेत मनधरणी केल्याची चर्चा शहरात सुरू होती.

आळंदी - खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आळंदीतील भाजपचे सर्व नगरसेवक युती धर्म पाळणार आहेत. भाजपचे नगरसेवक आणि आढळराव यांच्यात दिलजमाई करण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केलेली शिष्टाई यशस्वी झाली आहे. 

नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या निवासस्थानी नुकतीच बैठक झाली. बैठकीस खासदार आढळराव पाटील, उमरगेकर, त्यांचे पती अशोक कांबळे, उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले आणि नगरसेवक, भाजपचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख उपस्थित होते. आळंदीत नगराध्यक्ष आणि भाजपचे दहा नगरसेवक आहेत. शिवसेनेचे सहा, तर दोन अपक्ष नगरसेवक आहेत. यातील अपक्ष नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचार करीत आहेत; तर भाजपचे बहुतांश नगरसेवक सोशल मीडियात कोल्हे यांच्या समर्थनार्थ पोस्ट फॉरवर्ड करीत होते. नगरसेवक बालाजी कांबळे यांच्या हत्येनंतर पोटनिवडणुकीत भाजपने त्यांची पत्नी रुक्‍मिणी कांबळे यांना उमेदवारी दिली. 

बिनविरोध निवडीसाठी आढळराव यांच्याशी भाजप पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली होती. मात्र, शिवसेनेने कांबळे यांच्याविरोधात उमेदवार दिल्याने भाजपमध्ये नाराजी होती. त्यामुळे आढळराव यांनी लांडगे यांच्याशी चर्चा करून ही बैठक घेतली. आढळराव यांनी नगरसेवकांचे मन वळविले आणि लांडगे यांनी केलेली शिष्टाई कामाला आली. भाजपचे सर्व नगरसेवक खासदारांचा प्रचार करणार असून, युती धर्म पाळणार असल्याचा शब्द दिला.

Web Title: Loksabha Election 2019 BJP Corporator Mahesh Landge shivajirao adhalrao Politics