Loksabha 2019 : भाजपचे अपयश जनतेपर्यंत पोचवा - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

पिंपरी - ‘केंद्रातील भाजपच्या सरकारने गेल्या निवडणुकीत सत्तेवर येताना दिलेली आश्‍वासने पाळली नसून, सर्व पातळीवर ते अयशस्वी ठरले आहेत. येत्या तीन आठवड्यांत कार्यकर्त्यांनी ते आपापल्या भागातील जनतेला सांगावे,’’ अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकारी, बूथ अध्यक्षांना केली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, पिंपरी आणि मावळ या मतदारसंघांतील पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, बूथ अध्यक्ष यांच्याशी पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. 

पवार म्हणाले, ‘‘सत्तेवर येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार, परदेशातील काळा पैसा परत आणू, शेतकऱ्यांना हमीभाव, कर्जमाफी अशी अनेक आश्‍वासने भाजपने दिली होती. त्यांनी ती आश्‍वासने पूर्ण केली नाहीत. धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणाले होते. इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक झाले नाही. मराठा समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधण्यात येईल, असे सांगितले होते. एकाही जिल्ह्यात वसतिगृह बांधले नाही.

उद्योगपतींची कर्जे माफ केली. मात्र, शेतकऱ्यांची कर्जे माफ केली नाहीत. नोटाबंदीमुळे लोकांना त्रास सहन करावा लागला. राफेल विमाने जादा रक्कम देऊन खरेदी केली, त्याची कागदपत्रे गहाळ झाल्याचे सरकारने सांगितले. यांसह विविध बाबी कार्यकर्त्यांनी जनतेपुढे मांडल्या पाहिजेत.’’

कार्यकर्त्यांनी विचारलेल्या काही प्रश्‍नांनाही पवार यांनी उत्तरे दिली. पाटील यांनी स्वागत केले. पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आभार मानले. मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार या वेळी उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नाना काटे, मयूर कलाटे, वैशाली काळभोर, मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, तसेच सचिन घोटकुले, बाबूराव चांदेरे, रवींद्र माळवदकर आदी उपस्थित होते.

Web Title: Loksabha Election 2019 BJP Unsuccess Public Sharad Pawar Politics