Loksabha 2019 : बापट यांच्या संपत्तीत सव्वादोन कोटींची वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या संपत्तीत पाच वर्षांत आजच्या बाजारमूल्यानुसार दोन कोटी १५ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. त्यांच्याकडे सव्वापाच कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.

पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या संपत्तीत पाच वर्षांत आजच्या बाजारमूल्यानुसार दोन कोटी १५ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. त्यांच्याकडे सव्वापाच कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.

बापट यांनी पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक लढविली होती. त्या वेळी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांची संपत्ती ३ कोटी १० लाख ७१ हजार रुपये होती. त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शपथपत्रात सव्वापाच कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले.

त्यांच्याकडील वाहनांच्या ताफ्यात सव्वादोन लाखांची मर्सिडीज बेंझ (मॉडेल १९८३), १८ लाखांची पजेरो या गाड्यांसह आठ लाख रुपये किमतीचे महिंद्रा ट्रॅक्‍टर आणि एक हजार रुपयांची स्कूटर (मॉडेल १९७७) यांचा समावेश आहे. तर, त्यांच्या पत्नीकडे १४ लाख ७० हजारांची ह्युंदाई क्रेटा गाडी असून, त्यांच्या नावे दागिने, मुदत ठेवी आणि वाहने, अशी ५३ लाखांची मालमत्ता आहे.  बापट यांच्याकडे जडजवाहिर आणि दागिन्यांमध्ये एक लाख ३३ हजार रुपये किमतीचे ४० ग्रॅम सोने, तर त्यांच्या पत्नीकडे १२० ग्रॅम सोने (स्त्रीधन) यांचा समावेश आहे.

बापट यांच्याकडे केवळ ७५ हजारांची रोकड आहे. मुंबई येथील स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, संपदा बॅंकेत मुदत ठेवी, बचत खात्यात ठेवी आहेत. तर संपदा बॅंक, जनता सहकारी बॅंक, टेल्को आणि विश्‍वेश्‍वर बॅंकेचे सुमारे १८ हजार रुपयांचे शेअर्स आहेत. त्यांच्या नावावर अमरावती जिल्ह्यातील सावंगी मग्रापूर (ता. चांदूररेल्वे) येथे १२ हेक्‍टर जमीन आहे. तसेच येथील शनिवार पेठ, कसबा पेठ, बिबवेवाडी आणि मुंबईतील अंधेरी येथे सदनिका आहेत.

अठरा लाखांचे कर्ज
बापट यांच्यावर पाच वर्षांपूर्वी बॅंकेचे २५ लाखांचे कर्ज होते. सध्या त्यांच्यावर स्टेट बॅंकेचे आठ लाख रुपयांचे कर्ज आहे. तर, पत्नीच्या नावे जनता बॅंकेचे ९ लाख ८१ हजार रुपयांचे वाहन कर्ज आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Girish Bapat Property Increase