Loksabha 2019 : कांचन कुल यांच्याकडे पावणेपाच कोटींची संपत्ती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन राहुल कुल यांच्याकडे चार कोटी ७५ लाख ७२ हजार ७९० रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे.

पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन राहुल कुल यांच्याकडे चार कोटी ७५ लाख ७२ हजार ७९० रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे. यापैकी त्यांच्या नावे १ कोटी ८७ लाख २६ हजार १५ रुपयांची, पती आमदार राहुल कुल यांच्या नावे २ कोटी ५७ लाख १८ हजार ७०५ रुपयांची, मुलगा आदित्य याच्या नावे तीन लाख २८ हजार, तर मुलगी मायरा हिच्या नावे २८ लाख ७० रुपयांची संपत्ती असल्याचे दर्शविण्यात आले आहे. 

या संपत्तीत पती-पत्नीकडे असलेली रोख रक्कम, जंगम मालमत्ता, शेतजमीन, बिगरशेत जमीन, निवासी इमारती आदी स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. जंगम मालमत्तेत रोख ५० हजार रुपये, तर पती राहुल कुल यांच्याकडे रोख १ लाख २० हजार रुपये असल्याचे आणि पती-पत्नी आणि मुलाकडे मिळून ८७५ ग्रॅम सोने, पाच किलो चांदी, दोन इनोव्हा कार, २० लाख सात हजार ८९७ रुपयांची विमापत्रे आदींचा समावेश आहे. स्थावर मालमत्तेत पती-पत्नी व मुलीच्या नावे सात हेक्‍टर ९९ आर शेतजमीन, पती राहुल कुल यांच्या नावे २१ हजार २८४ चौरस फूट बिगरशेती जमिनीचा समावेश आहे.

मुलीच्या नावे असलेली १ हेक्‍टर ३९ आर शेतजमीन ही २०१८ मध्ये खरेदी करण्यात आली असून, उर्वरित सर्व जंगम मालमत्ता ही वारसाप्राप्त आहे. कांचन कुल यांच्या नावे बिगरशेती जमीन नाही. मात्र, त्यांनी २०१० मध्ये पुण्यातील येरवडा येथे ११७० चौरस फुटांची सदनिका खरेदी केलेली आहे.

साडेबावीस लाखांचे कर्ज
कुल पती-पत्नीकडे मिळून राहू येथील विविध कार्यकारी सोसायटी आणि दौंड येथील स्टेट बॅंकेचे २२ लाख ५० हजार २७९ रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये पाच लाख ९८ हजार रुपयांच्या पीक कर्जाचा, तर १६ लाख ५२ हजार ३७९ रुपयांच्या कार खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Kanchan Kul Property