Loksabha 2019 : दौंडच्या कुल घराण्याचे पवारांविरोधात तिसरे बंड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मार्च 2019

केडगाव - दौंड तालुक्‍यातील कुल घराण्याने लोकसभेच्या निमित्ताने बारामतीतील पवार कुटुंबीयांच्या विरोधात बंडाची हॅटट्रिक केली आहे. या अगोदरचे कुल यांचे दोन्ही बंड यशस्वी झाले असून, आता विजयाची हॅटट्रिक होणार का, हे निकालानंतर स्पष्ट होईल. सुभाष कुल यांनी सन १९९० मध्ये विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करीत विजय संपादन केला होता. त्यानंतर सन २०१४ मध्ये राहुल कुल यांनी पुन्हा पवार यांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला. राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा हाती घेत राहुल कुल यांनी विजय मिळविला.

केडगाव - दौंड तालुक्‍यातील कुल घराण्याने लोकसभेच्या निमित्ताने बारामतीतील पवार कुटुंबीयांच्या विरोधात बंडाची हॅटट्रिक केली आहे. या अगोदरचे कुल यांचे दोन्ही बंड यशस्वी झाले असून, आता विजयाची हॅटट्रिक होणार का, हे निकालानंतर स्पष्ट होईल. सुभाष कुल यांनी सन १९९० मध्ये विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करीत विजय संपादन केला होता. त्यानंतर सन २०१४ मध्ये राहुल कुल यांनी पुन्हा पवार यांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला. राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा हाती घेत राहुल कुल यांनी विजय मिळविला. निवडणुकीत पत्नी कांचन कुल यांना उतरवत कुल घराण्याने बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. कुल रासपत असले; मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधलेले कुल उमेदवारी नाकारू शकत नव्हते. त्यांनी पवार घराण्याला होम पीचवर आव्हान दिले. 

भाजपने लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत प्रतिभा लोखंडे, विराज काकडे, कांता नलावडे यांना उमेदवारी दिली. कुल घराणे हे भाजपसाठी आयात उमेदवार आहेत. कुल यांना उशिरा जाहीर झालेली उमेदवारी, मतदारसंघाची व्याप्ती या बाबी पाहता ते निवडणुकीचा धनुष्यबाण कसा पेलतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे. या उलट खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. 

विधानसभेसाठी रंगीत तालीम
लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही असला, तरी ही निवडणूक म्हणजे कुल व थोरात गटासाठी विधानसभेची रंगीत तालीम आहे. दौंड तालुक्‍यात लोकसभेला मताधिक्‍क्‍य देणारा गट विधानसभेला विजयी होतो. हा गेल्या निवडणुकीतील अनुभव आहे. आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत कुल विरुद्ध थोरात निवडणुकीच्या रिंगणात असण्याची दाट शक्‍यता आहे. त्यादृष्टीने लोकसभा निवडणुकीला महत्त्व आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Kul Family Sharad Pawar Politics