Loksabha 2019 : महायुतीचे उमेदवार जिंकणार - बापट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

महायुतीचीच हवा - ठाकरे 
महाराष्ट्राचा मी दौरा केला आहे. या दौऱ्यात सगळीकडे महायुतीचीच हवा आणि रंग आहे. हा रंग म्हणजे भगवा रंग होय. त्यामुळे राज्यात महायुतीला मोठे यश मिळेल, असा विश्‍वास युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आढळराव यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.

पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

राज्यातील लोकसभा निवडणुकीत सध्या फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच हवा आहे. त्यामुळे ‘हर हर मोदी, घर घर मोदी’, असेच या निवडणुकीचे ब्रीद वाक्‍य बनले आहे. जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा प्रतिसाद पाहता, पुणे शहर व जिल्ह्यातील महायुतीचे चारही उमेदवार किमान पाच लाखांहून अधिक मताधिक्‍यांनी विजयी होतील, असे भाकीत करत, जिल्ह्यात महायुती विजयाचा चौकार मारेल, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी (ता.९) व्यक्त केले. 

शिवसेना-भाजपचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने विजयी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत बापट बोलत होते. सभेनंतर बैलगाडीतून रॅलीने जात आढळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या संकल्प सभेला आमदार बाबूराव पाचर्णे, डॉ. नीलम गोऱ्हे, सुरेश गोरे, शरद सोनवणे, महेश लांडगे, योगेश टिळेकर, कल्पना आढळराव पाटील, सेनेचे जिल्हा प्रमुख राम गावडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय भेगडे, आशा बुचके, अरुण गिरे आदी उपस्थित होते. 

आढळराव बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालयात पोचल्यानंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. या रॅलीत बैलगाडा शर्यतीचा गाडाही आढळराव यांच्या बैलगाडीसमोर होता. बैलगाडा आणि बैलगाडी अशी ही रॅली होती.

मी सलग तीन निवडणुका जिंकलो आहे. दरवेळी माझे मताधिक्‍य वाढते आहे. बेरोजगारी, रस्ते आणि आरोग्यविषयक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. बैलगाडा शर्यतींसाठीही प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे पाच लाखांहून अधिक मताधिक्‍याने विजयी होईन. 
- शिवाजीराव आढळराव पाटील

Web Title: Loksabha Election 2019 Mahayuti Candidate Girish Bapat Politics