Loksabha 2019 : भोसरीतून सर्वाधिक मतदान करू - महेश लांडगे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

मोदी सरकारच्या काळात चाकण, खेड आदी भागातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ऐंशी टक्के रस्त्यांची कामे पूर्ण झाली. पुणे-नाशिक रेल्वेच्या प्रस्तावालाही मान्यता मिळाली असून, या कामांसाठी शंभर कोटी जमा झाले आहेत.
- शिवाजीराव आढळराव-पाटील, खासदार

भोसरी - ‘खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि माझ्यात काही विषयांवर मतभेद होते. मात्र, मी आढळराव-पाटील यांच्याविरोधात कधीही अपशब्द वापरला नाही. आमच्यातील मतभेद मिटले असून, कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचाराला लागावे. भोसरी विधानसभा मतदारसंघातून आढळराव-पाटील यांना सर्वाधिक मतदान मिळवून देऊ,’’ अशी ग्वाही आमदार महेश लांडगे यांनी येथे दिली.

भोसरीत शिवसेना-भाजप युतीच्या वतीने आयोजित विजय संकल्प मेळाव्यात लांडगे बोलत होते. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, पिंपरीचे महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, शिवसेना शहर संघटिका सुलभा उबाळे, पक्षनेते एकनाथ पवार, रवी लांडगे, भरत महानवर आदी उपस्थित होते.

डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडून आल्यावर बैलगाडा शर्यत सुरू करणार असल्याचा प्रचार करीत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना आढळराव म्हणाले, ‘‘दक्षिणेतील कलाकार शर्यतींसाठी आंदोलनात उतरले तेव्हा कोल्हे कोठे गेले होते? बैलगाडा मालकांबरोबर रस्त्यावर उतरून मी आंदोलन केले.’’ सूत्रसंचालन नीलेश मुटके यांनी केले. आभार विजय फुगे यांनी मानले.

Web Title: Loksabha Election 2019 Mahesh Landage Bhosari Shivajirao Adhalrao Politics