Loksabha 2019 : आघाडीत एकजूट; युतीत दिलजमाई बाकी

Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwad

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांची एकजूट, तर भारतीय जनता पक्ष व शिवसेना पदाधिकाऱ्यांची अद्याप दिलजमाई झाली नसल्याचे रविवारी (ता. २४) दिसून आले. निवडणूक प्रचाराच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ प्रतिनिधींनी दुपारी एक ते तीन या कालावधीत पाहणी केली. त्या वेळी राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठका व चर्चा सुरू होती. शिवसेनेच्या आकुर्डीतील कार्यालयाला कुलूप होते. मात्र, श्रीरंग बारणे यांच्या थेरगावातील कार्यालयात काही कार्यकर्ते सोशल मीडियावर चर्चा करीत होते. भाजपच्या मोरवाडी कार्यालयात काही ज्येष्ठ कार्यकर्ते कोल्हापूर येथे होणाऱ्या युतीच्या प्रचार सभेबाबत चर्चा करीत होते. ही सभाच दिशा ठरवेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

प्रचारापासून भाजप अद्याप दूरच
शिवसेनेचे शहर मध्यवर्ती कार्यालय आकुर्डीतील खंडोबामाळ चौकालगत आहे. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास कार्यालयाला कुलूप होते. सकाळी आलेले वर्तमानपत्र तसेच पडून होते. याचा अर्थ सकाळपासून कार्यालयात कोणीही फिरकलेले नाही, याची खात्री पटली. त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या थेरगावातील कार्यालयात पोचलो. तिथे सात-आठ कार्यकर्ते होते. काही बारणे यांचे नातेवाईक होते. सोशल मीडियाद्वारे प्रचाराबाबत त्यांच्यात चर्चा सुरू होती. कार्यक्रम, प्रचारासाठी बैठकी, गाठीभेटी यावर भर दिलेला दिसला. काही कार्यकर्ते जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीमुळे देहू येथे गेलेले होते. मतदारांशी संपर्क साधण्यासाठी वॉर रूम तयार केलेली आहे. तेथून सोशल मीडियाचे कामकाज सुरू आहे. व्हॉटस्‌ॲप, फेसबुकच्या माध्यमातून बारणे यांनी केलेली कामे लोकांपर्यंत पोचवत असल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितले. व्यापारी, उद्योजक, डॉक्‍टर, व्यावसायिक, वेगवेगळ्या संस्थांसोबत छोट्या सभा सुरू आहेत. 

भारतीय जनता पक्षाच्या मोरवाडीतील कार्यालयात पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बसलेले होते. कोल्हापूरला रविवारी सायंकाळी होणाऱ्या युतीच्या प्रचार सभेबाबत त्यांच्यात चर्चा सुरू होती. ‘आजच्या सभेनंतर पक्ष नेतृत्वाचे आदेश येतील त्यापद्धतीने प्रचाराची दिशा ठरवली जाईल. नेत्यांच्या सभा, प्रचार फेऱ्या याबाबत नियोजन केले जाणार आहे’, असे एका कार्यकर्त्याने सांगितले. 

दृष्टिक्षेप
 शिवसेनेची निवडणूक प्रचारासाठी सध्या एकला चलो रे भूमिका
 सोशल मीडियाद्वारे प्रचाराबाबत चर्चा सुरू
 भाजप कार्यकर्त्यांचे कोल्हापूरच्या सभेकडे लक्ष
 मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर 

प्रचाराचे नियोजन लवकरच... 
भाजप-शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे लक्ष कोल्हापूरच्या सभेकडे लागलेले असल्याचे रविवारी आढळले. त्या सभेनंतर भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर होणार आहे. पक्षनेत्यांच्या आदेशानुसार काम करणार आहे. त्यासाठी लवकरच नियोजन होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक
मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पक्षाच्या खराळवाडी येथील कार्यालयात रविवारी बैठकांचे सत्र सुरू होते. नियोजनबद्ध प्रचारासाठी २७ समित्या स्थापन केल्या असून, येत्या दोन दिवसांत काळभोरनगर येथे मुख्य प्रचार कार्यालय सुरू होणार आहे.

पक्ष कार्यालयाच्या एका कक्षात दुपारी दोनच्या सुमारास पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. तर दुसऱ्या कक्षात काही पदाधिकारी प्रचाराच्या नियोजनाबाबत चर्चा करीत होते. राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष यांचे झेंडे ठेवलेले होते. बैठकीचा कानोसा घेतला असता, पार्थ यांच्या प्रचारासाठी कोणत्या नेत्याची सभा कधी ठेवायची? त्याचे नियोजन कोणी करायचे? कोणत्या कार्यकर्त्यांकडे कोणती जबाबदारी दिली तर जास्त यशस्वी होईल, याबाबत चर्चा सुरू होती. पदाधिकाऱ्यांकडे विविध ठिकाणच्या कार्यकर्त्यांची यादी होती. पक्षाच्या शहराध्यक्षांच्या कक्षात गुप्त खलबते सुरू होती. 

दृष्टिक्षेप
 काळभोरनगरला तीन हजार चौरस फुटांचे मध्यवर्ती प्रचार कार्यालय
 विविध समूह, गट, संस्था, संघटनांसमवेत स्वतंत्र मेळावे घेणार
 नेत्यांच्या प्रचार सभा, मेळाव्यांबाबतचे नियोजन दोन दिवस अगोदर
 सोशल मीडिया सेलसाठी नियुक्ती होणार

प्रचारासाठी विविध २७ समित्या
मंडप, प्रचारासाठी लागणारे विविध प्रकारचे सरकारी परवाने, वॉररूम, मतदारांसाठीच्या स्लिप वाटप, अशा विविध २७ विषयांनुसार समित्या स्थापन करून कार्यकर्त्यांवर जबाबदारी निश्‍चित केली आहे. प्रचार सभांचे नियोजन प्रदेश कार्यालयाकडून आल्यानंतर त्यानुसार शहर कार्यालय नियोजन करणार आहे. याबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्यात नुकतीच बैठक झाली असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com