Loksabha 2019 : ...तेव्हा जात का आठवली नाही - अजित पवार

Ajit-Pawar
Ajit-Pawar

पुणे - ‘शिरूर लोकसभा मतदारसंघात काही लोकांकडून आमच्या उमेदवाराची वारंवार जात काढली जात आहे. जे आज जात काढत आहेत, ते यापूर्वी तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. तेव्हा त्यांना जात का आठवली नाही ?’’, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी उपस्थित केला.  

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. खासदार ॲड. वंदना चव्हाण, शहराध्यक्ष चेतन तुपे, राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. जयदेव गायकवाड, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे आदींसह पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाच्या कामगार आघाडीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या महेश शिंदे यांनी सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. 

पवार म्हणाले, ‘‘गेली २५ वर्षे युती सडली म्हणणारे, अफजल खानाची उपमा देणारे, आज पुन्हा एकत्र आले आहेत. आता त्यांना इतरांच्या जाती आठवत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला हडपसर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचंड मताधिक्‍य हवे आहे. सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून आघाडी टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी काम केले पाहिजे. पुणे लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार जाहीर होणे गरजेचे होते, मात्र तो जाहीर होईपर्यंत कार्यकर्त्यांनी इतर मतदारसंघात जाऊन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करावा. आपला मतदारसंघ सांभाळून दुसऱ्या मतदारसंघातील काम करावे.’’ पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अशोक राठी यांनी सूत्रसंचालन केले.

स्वतःचा मतदारसंघ सांभाळा ! 
काही जण स्वतःचा मतदारसंघ सोडून थेट राज्य पातळीवरच प्रचाराला जातात. असे न करता स्वतःचा मतदारसंघ आणि आघाडीचा धर्म पाळा, एक महिनाभर रात्री उशिराच घरी जा, जे ‘सूर्यमुखी’ असतील त्यांनी सकाळी लवकर उठावे, दुपारच्या वेळी सहकाऱ्यांसोबतच जेवण करावे, महिनाभर वामकुक्षी सोडा, केवळ लग्न आणि साखरपुड्यांना हजेरी लावून प्रचार करू नका, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com