Loksabha 2019 : जाधव, पडळकर यांचे अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

घोषणा आणि ढोल-ताशा, हलगीच्या तालावर वंचित बहुजन आघाडीचे पुण्यातील उमेदवार अनिल जाधव आणि बारामतीचे उमेदवार नवनाथ पडळकर यांनी बुधवारी (ता. ३) जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तर पडळकर यांनी विधान भवन येथे उमेदवारी अर्ज भरला.

पुणे - घोषणा आणि ढोल-ताशा, हलगीच्या तालावर वंचित बहुजन आघाडीचे पुण्यातील उमेदवार अनिल जाधव आणि बारामतीचे उमेदवार नवनाथ पडळकर यांनी बुधवारी (ता. ३) जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तर पडळकर यांनी विधान भवन येथे उमेदवारी अर्ज भरला. 

गंजपेठेतील महात्मा फुले वाडा येथून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीस सुरवात झाली. त्या वेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणांनी फुले वाडा दुमदुमला होता. प्रकाश आंबेडकर यांचे बंधू भीमराव आंबेडकर, भारिपचे शहराध्यक्ष अतुल बहुले, एमआयएमचे शहराध्यक्ष लियाकत खान, अंजुमन इनामदार, डॅनिअल लांडगे, वसंत साळवे, बाबा साबळे आदी उपस्थित होते. 

‘‘काँग्रेस व भाजपने समाजकारणाचे राजकारण केले. माझ्या विरोधात गिरीश बापट आहेत की मोहन जोशी याचा विचार करीत नाही. शहराचा विकास भकास झाला आहे. आजही बहुजन समाज शिक्षणासह अनेक मूलभूत बाबींपासून वंचित आहे. शिक्षणाचा व्यापार मोडून ‘केजी टू पीजी’ शिक्षण मोफत उपलब्ध करण्याचा अजेंडा आहे,’’ असे जाधव यांनी सांगितले. पुण्यासह राज्यात काँग्रेस आणि भाजपचे दिग्गज उमेदवार आहेत. मात्र वंचित बहुजन आघाडीने त्यांना घाम फोडला आहे. पुण्यातील दोन्ही उमेदवार एका सांस्कृतीमधून आले आहेत. त्या संस्कृतीने वंचितांना कधीच स्थान दिले नाही. वंचित समाज हा विकासापासून दूर राहिला आहे. सत्ताधाऱ्यांना पराभूत करून सत्ता वंचितांच्या हाती देण्याच्या आमचा प्रयत्न आहे, असे आंबेडकर म्हणाले.

Web Title: Loksabha Election 2019 Politics Anil jadhav navnath Padalkar Form