Loksabha 2019 : जनतेचा जाहीरनामा, तोच आमचाही!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मार्च 2019

वाहतूक, शिक्षण, आरोग्य, कला-संस्कृती आदी विविध क्षेत्रांबाबत पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांनुसार तयार झालेला जनतेचा जाहीरनामा शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या साक्षीने शनिवारी राजकीय पक्षांकडे सुपूर्त करण्यात आला.

पुणे - वाहतूक, शिक्षण, आरोग्य, कला-संस्कृती आदी विविध क्षेत्रांबाबत पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांनुसार तयार झालेला जनतेचा जाहीरनामा शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या साक्षीने शनिवारी राजकीय पक्षांकडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष आदी पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यातील मुद्द्यांचा समावेश त्यांच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्याची एकमुखाने ग्वाही दिली.

तत्पूर्वी, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी जनतेच्या जाहीरनाम्याबाबतची भूमिका आणि राजकीय पक्षांकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षा या प्रसंगी व्यक्त केल्या. वाहतूक, शिक्षण, आरोग्य, कला-संस्कृती, कौशल्य, कायदा सुव्यवस्था, नगर नियोजन, गृहनिर्माण आदी क्षेत्रांवर आधारित पुणेकर नागरिक आणि तज्ज्ञांच्या मदतीने ‘सकाळ’ने ‘जनतेचा जाहीरनामा’ तयार केला आहे. ‘सकाळ’मधून यापूर्वीच तो विस्तृत स्वरूपात प्रसिद्ध केला आहे. तो जाहीरनामा तज्ज्ञांनी आज राजकीय पक्षांकडे सुपूर्त केला. राजकीय पक्षांनी जनतेच्या जाहीरनाम्याची दखल घेऊन त्यांतील मुद्दे त्यांच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करावेत, असे अपेक्षित आहे.

ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहरप्रमुख महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, भाजपतर्फे सरचिटणीस उज्ज्वल केसकर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे समन्वयक प्रदीप देशमुख, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे तसेच उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, राजेश येनपुरे, योगेश समेळ, रवींद्र धंगेकर, प्रशांत बधे, लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार गिरीश बापट आदी उपस्थित होते. नगर नियोजनकार अनघा परांजपे-पुरोहित, सार्वजनिक वाहतुकीच्या अभ्यासक प्रांजली देशपांडे-आगाशे, रेल्वेच्या अभ्यासिका हर्षा शहा, निवृत्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरेश कमलाकर, निवृत्त निरीक्षक विजय सोनुने, सॅसकॉमचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर या तज्ज्ञांच्या हस्ते जनतेचा जाहीरनामा राजकीय पक्षांना सुपूर्त करण्यात आला. ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी, प्रशासन आणि राजकीय पक्षांकडून असलेल्या जनतेच्या अपेक्षांचा समावेश राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात व्हावा, या उद्देशाने ‘सकाळ’ने हा उपक्रम आयोजित केल्याचे प्रास्ताविकात सांगितले. मुख्य बातमीदार संभाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रिन्सिपल कॉरसपॉन्डंट मंगेश कोळपकर यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Public Declaration Political party Politics