Loksabha 2019 : पुणे शहरातील निवडणुका १२९ कुटुंबांभोवतीच

Politics
Politics

पुणे - समाजात वेगाने बदल होत असताना लोकप्रतिनिधी मात्र ठराविक आडनावाचेच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील गेल्या २७ वर्षांतील निवडणुकांचा एका अभ्यासकाने अभ्यास केला आहे. त्यातून लोकप्रतिनिधिपदावर १२९ आडनावांचेच प्राबल्य असल्याचे उघड झाले आहे.

महापालिका असो अथवा लोकसभा, विधनासभा निवडणुका. त्यात ठराविक कुटुंबांमधूनच लोकप्रतिनिधी निवडले जात असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभ्यासक अविनाश मधाळे यांनी या बाबत प्रबंध सादर केला आहे. या कुटुंबांमधून लोकप्रतिनिधी होणाऱ्यांमध्ये जात, धर्म, वर्ग असे कोणतेही निकष लागू होत नाहीत, हे विशेष. 

शहराची भौगोलिक रचना लक्षात घेतली, तर विशिष्ट आडनावांचे राजकारणात प्राबल्य आढळले आहे. उदा. - सातारा रस्त्यावर धनकवडे, भिंताडे, कदम तर सिंहगड रस्त्यावर जगताप, चरवड, गोसावी, दांगट, नवले, वारजे-शिवणे, कर्वेनगर भागात सुतार, बराटे, दोडके, वांजळे, मेंगडे, दुधाने नगर रस्त्यावर पठारे, टिंगरे, खांदवे, गलांडे, मुळीक, सोलापूर रस्त्यावर तुपे, मगर, घुले, गायकवाड, ससाणे, बनकर आदींचे प्राबल्य आहे. शहराच्या मध्य भागातही बापट, शिरोळे, आंदेकर, शिंदे आदी आडनावांतून वारंवार लोकप्रतिनिधी झाले आहेत.  मधाळे यांनी १९९२ पासूनच्या चार महापालिकांच्या निवडणुकांचा अभ्यास केला आहे. काही कुटुंबांमधूनच पुढे आमदार आणि खासदार झाल्याची उदाहरणे आहेत. या अभ्यासात प्रामुख्याने लोकप्रतिनिधी झालेल्या कुटुंबांचा समावेश आहे. सामाजिक, राजकीय पार्श्‍वभूमी असलेल्या कुटुंबांना राजकीय पक्षांकडूनही प्राधान्य मिळते. निवडून येण्याची क्षमता हा निकषही त्यासाठी महत्त्वाचा समजला जातो. मात्र काही वेळा कोणतीही पार्श्‍वभूमी नसताना लोकप्रनिधित्व मिळविले आणि पुढे ते टिकविले अशीही उदाहरणे शहराच्या राजकारणात आहेत. शहरातील बहुतेक मतदारसंघातून कांबळे या आडनावाचे १७ लोकप्रतिनिधी झाले आहेत. शहरात हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळले आहे.

ज्या वेळी प्रभाग पद्धतीने निवडणूक होते, तेव्हा राजकीय पार्श्‍वभूमी असलेल्या कुटुंबांतील सदस्यांना लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळाली आहे. तुलनेने नव्या कुटुंबातून लोकप्रतिनिधी होणाऱ्या सदस्यांची संख्या कमी आहे.  
- अविनाश मधाळे, राज्यशास्त्र अभ्यासक

पुण्याच्या विस्तारात सहभागी गावांचा स्थानिक राजकारणावर प्रभाव राहिला आहे. तसेच बाहेरू रोजगार-शिक्षणासाठी येणारे लोक विशिष्ट भागातच राहतात. त्याचाही परिणामी स्थानिक राजकारणावर होतो. तसेच राजकीय पार्श्‍वभूमी असलेल्या कुटुंबांनाही राजकीय पक्षांकडून प्राधान्य दिले जाते. त्यामुळे निवडणुका विशिष्ट कुटुंबांभोवती फिरतात. 
- प्रा. प्रकाश पवार, राज्यशास्त्र विभागप्रमुख, फर्ग्युसन महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com