Loksabha 2019 : ‘सकाळ’मध्ये राजकीय सर्जिकल स्ट्राइक (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

‘बाणासाठी पक्ष सोड तू, पक्षांतर कर लाजू नको...’, ‘एका घरात राहू की नको...’, ‘नेत्यांच्या मागे फिरताय पोरं...’ अशा रचनांतून निवडणूक व राजकारणावर सर्जिकल स्ट्राइक करीत कवींनी प्रहार केला. निमित्त होते ‘सकाळ फेसबुक लाइव्ह’साठी आयोजित ‘रंग निवडणुकीचे, ढंग कवितेचे’ या कविसंमेलनाचे.

पुणे - ‘बाणासाठी पक्ष सोड तू, पक्षांतर कर लाजू नको...’, ‘एका घरात राहू की नको...’, ‘नेत्यांच्या मागे फिरताय पोरं...’ अशा रचनांतून निवडणूक व राजकारणावर सर्जिकल स्ट्राइक करीत कवींनी प्रहार केला. निमित्त होते ‘सकाळ फेसबुक लाइव्ह’साठी आयोजित ‘रंग निवडणुकीचे, ढंग कवितेचे’ या कविसंमेलनाचे.

संमेलनाची सुरवात अनिल दीक्षित यांच्या ‘एका घरात राहू का नको, काय ते पत्रात लिवा’ या विडंबनाने झाली. ज्येष्ठ कवी बंडा जोशी यांनी ‘सत्तेसाठी काहीही कर, भीड मुळी बाळगू नको’ हा फटका व ‘लोकशाहीची हे नेते घालवती शान...’ या विडंबनातून राजकारण्यांना चिमटे काढले. भालचंद्र कोळपकर यांनी राजकारणातील घराणेशाहीवर प्रहार केला. राजकारण व सत्तेतील खादाडपणावर हल्ला करताना सुहास घुमरे म्हणाले, ‘मंत्री होता आमदाराचे पोट सुटले कसे.’ प्रा. विजय लोंढे यांनी ‘निवडणुकीचे बिगुल वाजले’ म्हणत उमेदवारांच्या राजकीय भूमिकेवर ताशेरे ओढले. ‘कितीक झेंडे, किती रंगाचे, मैदानात या आले...’ या रचनेतून सुनीता काटम यांनी नेत्यांच्या पक्षांतरावर मार्मिकपणे भाष्य केले. नीलेश म्हसाये यांनी ‘पाणपोई’ कवितेतून नेत्यांच्या वागणुकीबाबत चिमटे घेतले. पीतांबर लोहार यांनी ‘नेत्यांच्या मागे फिरताय पोरं’ म्हणत निवडणूक आणि तरुणाईचे वास्तव मांडले. ‘सकाळ’चे उपसंपादक व कवी मंगेश महाले यांनी सूत्रसंचालन करून संमेलनात रंगत आणली.

Web Title: Loksabha Election 2019 Sakal Political Surgical Strike Kavisammelan