Loksabha 2019 : आरोप राजकीय द्वेषातून - श्रीरंग बारणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

मनभेद नव्हते
चुकांचा शोध घेण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे आम्हाला हितावह वाटले. आमच्यामध्ये मतभेद होते, मनभेद कधीच नव्हते, व्यक्‍तिगत आकस नव्हता. पक्षापेक्षा देश मोठा आहे. त्यामुळे सुरवातीला देशहित, त्यानंतर पक्ष हे धोरण महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाला गरज आहे. त्यामुळे देशहितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. श्रीरंग बारणे यांना दोन लाखांच्या मताधिक्‍याने निवडून आणू. चिंचवडमध्ये त्यांना चांगले मताधिक्‍य मिळवून देऊ. राजकारण हे महायुद्ध असते. त्यामुळे राष्ट्रवादीचे आव्हान पेलणार असल्याचे लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.

पिंपरी - ‘भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर आजपर्यंत मी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे व निराधार आहेत. यामागे माझा राजकीय हेतू होता,’’ अशी थेट कबुली शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी जगताप यांच्या साक्षीने सोमवारी (ता. ८) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच, येथून पुढे जगताप व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेऊनच वाटचाल राहील, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी या वेळी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातून बारणे यांच्या उमेदवारीला पूर्वीपासून जगताप यांचा टोकाचा विरोध होता. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी प्रयत्नशील होते. यासाठी बारणे यांनी जगताप यांची मनधरणी केली होती. परंतु जगताप तयार होईनात. जगताप व त्यांच्या समर्थकांची मिळून सव्वालाख मते असल्याचे गृहीत धरले जाते.

साहजिकच त्यांची नाराजी ओढवून घेणे शिवसेनेला परवडणारे नव्हते. या पार्श्‍वभूमीवर वरिष्ठ नेते त्यांच्या संपर्कात होते. रविवारी (ता. ७) मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार जलसंपदामंत्री गिरीश महाजन पिंपळे गुरवमधील जगताप यांच्या निवासस्थानी आले. या वेळीही जगताप ठाम राहिले. ‘‘बारणे यांनी पक्षावर १४ आरोप केले आहेत. ते सर्व खोटे आहेत. त्यामुळे त्यांनी जाहीररीत्या मागे घ्यावेत,’’ अशी त्यांची मागणी होती. यानंतर वेगाने घडामोडी घडल्या. या पार्श्‍वभूमीवर बारणे यांनी पत्रकार परिषदेत सर्व आरोप मागे घेतले.

भाजपकडून चांगली विकासकामे
भाजपने महापालिकेच्या माध्यमातून शहरात अनेक चांगली विकासकामे केली आहेत. जगताप यांनी भाजपच्या माध्यमातून शहरातील अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. व्यक्तिगत पातळीवर टीका करणे योग्य नव्हते. भाजप पदाधिकाऱ्यांसोबतच्या सर्व मतभेदांना मूठमाती देऊन आम्ही सर्व जण एक नवीन सुरवात करणार आहोत. लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्व जण एकदिलाने काम करून भगवा फडकवणार आहोत. 

बारणे यांनी केलेले आरोप 
महापालिकेत आम्ही सगळे भाऊ सारे मिळून खाऊचा कारभार सुरू आहे. ब्लॅकमेलिंग करणारेच आता कारभारी झालेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे शहर बदनाम होत आहे. शहरातील अतिक्रमणधारकांकडून राजकीय लोक हप्ते घेत आहेत. भाजपने समाविष्ट गावांतील रस्त्यांच्या कामांमध्येही कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला. कचरा उचलण्याच्या कामातही भ्रष्टाचार झाला.

Web Title: Loksabha Election 2019 Shrirang Barne Accusation Laxman jagtap Politics