Loksabha 2019 : बारणे-जगताप चर्चाच बंद

अविनाश म्हाकवेकर
गुरुवार, 4 एप्रिल 2019

खासदार श्रीरंग बारणे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात आता समेट होणारच नसल्याची खात्रीलायक माहिती ‘सकाळ’च्या हाती लागली आहे. काही वर्षांपूर्वी निर्माण झालेले अनेक मतभेद संपुष्टात येण्याऐवजी वाढीस लागले आहेत.

पिंपरी - खासदार श्रीरंग बारणे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात आता समेट होणारच नसल्याची खात्रीलायक माहिती ‘सकाळ’च्या हाती लागली आहे. काही वर्षांपूर्वी निर्माण झालेले अनेक मतभेद संपुष्टात येण्याऐवजी वाढीस लागले आहेत.

शिवसेनेचे बारणे युतीचे उमेदवार म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे वादाचा परिणाम आपल्या मतांवर होऊ नये यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात जगताप यांची घरी जाऊन भेट घेतली होती. तसेच समजूत काढण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजनही आले होते. त्यामुळे दिलजमाई झाली, असे मानले जात होते. मात्र, आमच्यावर केलेले १४ खोटे आरोप कसे विसरू? एकदा नाही म्हणजे नाही, अशी उघड भूमिका जगताप समर्थकांची आहे. शिवाय बारणे यांनी त्यांच्या प्रचारपत्रकांवर जगताप यांचे छायाचित्र वापरलेले नाही. जगताप यांची हक्काची म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघात सव्वा लाख मते आहेत.

२००८ च्या महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बेबनाव झाल्याच्या समजातून बारणे-जगताप कायमचेच दूर झाले. तेव्हापासून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत दूरच आहेत. या निवडणुकीत बारणे उमेदवार आहेत. तर युतीमुळे भाजपचे जगताप रिंगणाबाहेर राहिले आहेत. 

तरीही त्यांच्यातील वाद कायमच आहेत. त्यामुळे वादावर पडदा पडावा यासाठी बारणे यांनी २५ मार्चला जगताप यांची भेट घेतली. परंतु भेटीत काय झाले हे दोघांनीही सांगणे टाळले. नंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत, नीलम गोऱ्हे यांनीही घेतलेल्या भेटीतूनही काही निष्पन्न झाले नाही. शेवटी भाजपकडून महाजन यांनी समजूत काढली. 

तसेच युतीधर्म म्हणून बारणे यांच्या प्रचार कार्यात सहभागी होण्याचे सांगितले. त्यामुळे वातावरण बदलले असे मानले जाऊ लागले. परंतु, जगताप यांनी प्रचारासाठी आवश्‍यक असलेल्या बाबी महाजनांना सांगितल्या. त्यावर तत्काळ कार्यवाही होईल, असे शिवसेनेतर्फे आमदार गौतम चाबुकस्वार या वेळी म्हणाले. त्यापैकी एक म्हणजे पक्षाचे प्रचार कार्यालय उभारणी. मात्र, त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही.

आम्ही अंधारात का उडी मारू?
यातूनच जगताप समर्थकांचा राग पुन्हा उफाळून आला आहे. हिंजवडी शेजारच्या एका गावात मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत साऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. ‘‘बारणे, तुम्ही आमच्या नेत्यांच्या घरी येऊन कितीही वेळा भेट घेतली तरी एकदा नाही म्हणजे नाही. आमचा निर्णय झालेला आहे. तुमचा इतिहास पाहता मदत करूनही उलटण्याशिवाय तुम्ही राहणार नाही. तुमची निवडणुकीची तयारीच झालेली नाही. सगळे चित्र समोर दिसत आहे. मग आम्ही अंधारात उडी कशासाठी मारायची,’’ अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली आहे. लक्ष्मण जगताप या बैठकीला उपस्थित नव्हते.

बारणे समर्थक जगतापांवर नाराज
बारणे समर्थकही जगताप यांच्या भूमिकेवर नाराज आहेत. नुकत्याच छापलेल्या प्रचारपत्रकांवर जगताप यांचे छायाचित्र वापरलेले नाही. तसेच निवडणूक तयारीविषयीची कोणतीही माहिती जगताप यांच्यापर्यंत पोचणार नाही याचीही काळजी घेतली आहे. प्रचार कार्यालयासाठी जागेची शोधमोहीम सुरू आहे, एवढेच काहीजण खासगीत बोलतात.

Web Title: Loksabha Election 2019 Shrirang Barne Laxman Jagtap Discussion Politics