Loksabha 2019 : बारणे, जगताप यांची कसोटी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची निवासस्थाने चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत मताधिक्‍य व मतदानाची टक्केवारी वाढविण्याची जबाबदारी दोघांवर होती. मात्र, केवळ 56.29 टक्केच मतदान झाल्याने मताधिक्‍याबाबत दोघांची कसोटी लागली आहे.

मतदान केंद्रनिहाय आकडेवारीनुसार मताधिक्‍याचे बांधले जाताहेत आडाखे
पिंपरी - महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची निवासस्थाने चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत मताधिक्‍य व मतदानाची टक्केवारी वाढविण्याची जबाबदारी दोघांवर होती. मात्र, केवळ 56.29 टक्केच मतदान झाल्याने मताधिक्‍याबाबत दोघांची कसोटी लागली आहे. यामुळे मतदान केंद्रांनुसार झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार कोणाला? कुठे? अधिक मतदान झाले असेल, याचे आडाखे बांधले जात आहेत.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांच्या प्रचारासाठीची पहिली जाहीर सभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंचवडमधील वाल्हेकरवाडीत घेतली. त्यानंतर महायुतीने विद्यमान खासदार बारणे यांची उमेदवारी जाहीर केली. त्याला आमदार जगताप यांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर जगताप प्रचारात सक्रिय झाले. या मतदारसंघ क्षेत्रात महायुतीचे 41, राष्ट्रवादीचे 12 व तीन अपक्ष नगरसेवक आहेत. यातील एक भाजप पुरस्कृत आहे. त्यामुळे जगताप यांचे प्रचारात सक्रिय होणे गरजेचे होते. कारण, महायुतीचे मताधिक्‍य वाढवायचे आहे.

जगताप यांचे अधिक प्रस्थ असलेल्या पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, नवी सांगवी, जुनी सांगवी भागांतील केंद्रांवर 45 ते 57 टक्के तर, बारणे यांचे सर्वाधिक प्रस्थ असलेल्या थेरगाव भागातील केंद्रांवर 50 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत मतदान झाले आहे. बोटावर मोजण्याइतक्‍या भागात यापेक्षा अधिक मतदान झाले आहे. त्यात भाजपला मानणारा सर्वाधिक वर्ग असलेल्या चिंचवडगाव परिसरातील केंद्रांचा समावेश आहे. येथे भाजपचे सुरेश भोईर व राजेंद्र गावडे, शिवसेनेच्या अश्‍विनी चिंचवडे व राष्ट्रवादीच्या अपर्णा डोके नगरसेविका आहेत. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख गजानन चिंचवडे येथे राहतात. लगतच्या दळवीनगर, प्रेमलोक पार्क, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर भागांतील चारही नगरसेवक भाजपचे आहेत. 55 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत मतदान झालेल्या किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी, विकासनगर भागात भाजपचे दोन व राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक असल्याने पारडे समसमान आहे.

50 ते 55 टक्के मतदान झालेल्या पुनावळे, वाकड भागांत शिवसेनेचे तीन व राष्ट्रवादीचा एक नगरसेवक आहे. या भागाचे नेतृत्व शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे व युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मयूर कलाटे करीत आहेत. येथे त्यांची कसोटी आहे. लगतच्या पिंपळे निलख, विशालनगर, कस्पटेवस्ती, रक्षक सोसायटी, रहाटणी गावठाण, तापकीरनगर भागांतील आठही नगरसेवक भाजपचे आहेत. येथे राष्ट्रवादीचे मित्रपक्ष कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांचे निवासस्थान आहे. जगताप राहात असलेल्या पिंपळे गुरव, सुदर्शनगर व त्यांचा प्रभाव असलेल्या जुनी सांगवी, नवी सांगवी भागांतील तीन प्रभागांतील 12 पैकी 11 नगरसेवक भाजपचे आहेत.

नवनाथ जगताप अपक्ष आहेत. मात्र, आयटीयन्सचे सर्वाधिक मतदान असलेल्या शिवार गार्डन, कापसे लॉन, पिंपळे सौदागर, रोजलॅण्ड सोसायटी भागांत भाजपचे शत्रुघ्न काटे, निर्मला कुटे व राष्ट्रवादीचे शीतल काटे व नाना काटे नगरसेवक आहेत. यामुळे समसमान पारडे आहे. यावरून विजयासाठी मताधिक्‍याची गणिते आखली जात आहेत.

मताधिक्‍यास जबाबदार
भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मयूर कलाटे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, भाजपचे शत्रुघ्न काटे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Shrirang Barne Laxman Jagtap Politics