Loksabha 2019 : अर्ज भरण्यासाठी विनायकीचा मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

मावळ लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नऊ एप्रिलचा मुहूर्त निश्‍चित केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने रंग चढणार आहे.

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नऊ एप्रिलचा मुहूर्त निश्‍चित केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने रंग चढणार आहे.

पार्थ पवार नऊ तारखेला सकाळी अकरा वाजता अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी खंडोबा माळ किंवा संभाजी चौक या दोन्हीपैकी एका ठिकाणाहून प्राधिकरण कार्यालयापर्यंत रॅली काढण्याचे नियोजन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. पवार यांचा अर्ज दाखल करताना अजित पवार, सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे आदी उपस्थित राहणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.

शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे दुपारी एक वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याअगोदर महायुतीचे कार्यकर्ते आकुर्डी ते प्राधिकरण कार्यालयापर्यंत रॅली काढणार आहेत. निवडणूक कार्यालयामध्ये बारणे यांचा अर्ज दाखल करताना आदित्य ठाकरे, गौतम चाबुकस्वार, बाळा भेगडे उपस्थित राहणार आहेत. सध्या या दोन्ही उमेदवारांनी घाटाखालील मतदारसंघांमध्ये प्रचार करण्यावर सर्वाधिक भर दिला आहे. दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर त्यांचा शहरातील प्रचाराचा जोर वाढणार आहे. 

जगताप यांना देणार निमंत्रण
उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपस्थित राहावे, यासाठी मी स्वतः त्यांना भेटून निमंत्रण देणार असल्याचे श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

नऊ तारखेचा मुहूर्त का? 
नऊ एप्रिल रोजी विनायकी चतुर्थी असून त्या दिवशी अंगारक योग आहे. शुभकार्यासाठी हा दिवस चांगला मानला जातो. त्यामुळेच की काय या दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी या दिवसाची निवड केली असावी. शनिवारी (ता. ६) गुढीपाडवा असला, तरी सरकारी सुटी असल्यामुळे त्या दिवशी उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार नाही.

युतीचे संयुक्‍त कार्यालय 
मावळ मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे संयुक्‍त कार्यालय येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. गेल्या आठवड्यापासून या कार्यालयासाठी दोन्ही पक्षांकडून जागेचा शोध सुरू होता. त्यामध्ये पिंपरीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि थेरगाव या दोन भागांचा समावेश होता. युतीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील जागा निश्‍चित करण्यात आली आहे. 

Web Title: Loksabha Election 2019 Shrirang Barne Parth Pawar Form Politics