Loksabha 2019 : आदिवासींच्या हक्कासाठी लढायचे आहे - पार्थ पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

‘कर्जत तालुक्‍यातील वनजमिनीवर वास्तव्य करणाऱ्या आदिवासींना घरापर्यंत रस्ता बनवायचा आहे. त्यांच्या घरात वीज पोचविण्याचे काम करायचे आहे आणि वन खात्याच्या परवानगीसाठी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपल्याला संसदेत जायचे आहे,’’ असे मत मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी व्यक्त केले.

नेरळ - ‘कर्जत तालुक्‍यातील वनजमिनीवर वास्तव्य करणाऱ्या आदिवासींना घरापर्यंत रस्ता बनवायचा आहे. त्यांच्या घरात वीज पोचविण्याचे काम करायचे आहे आणि वन खात्याच्या परवानगीसाठी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपल्याला संसदेत जायचे आहे,’’ असे मत मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी व्यक्त केले. 

कर्जत तालुक्‍यातील कशेळे येथे पवार यांच्या सभेचे आयोजन केले होते. या वेळी कर्जतचे आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषदेचे सभापती नारायण डामसे, नरेश पाटील, सदस्या रेखा दिसले, प्रमोद हिंदूराव, शेकापचे नेते विलास थोरवे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे, तानाजी चव्हाण, अशोक भोपतराव, अरविंद पाटील उपस्थित होते.

भीमाशंकर घाटरस्त्याचा प्रश्‍न भाजप सरकारने सोडविला नाही. त्याच वेळी आजही अनेक आदिवासी वाड्या रस्त्याने जोडल्या नाहीत. माथेरानला जाण्यासाठी वाहतूक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी, तसेच माथेरान आणि सह्याद्री या डोंगररांगांना लागलेला इकोसेन्सेटिव्ह झोनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी आपल्याला पाठवायचा आहे आणि काँग्रेस आघाडीने तो पर्याय मावळ लोकसभा मतदारसंघात निर्माण केला आहे, त्याला आपले प्रेम पाहिजे आहे, असे प्रतिपादन पार्थ यांनी केले.

कळंब येथील सभेत बोलताना सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी महाआघाडीचे उमेदवार हे पदवीधर आहेत. मात्र, विरोधी पक्षाचे उमेदवार हे केवळ नववी शिकलेले आहेत. त्यामुळे मतदारांनी कोणाला मत द्यायचे हे ठरवावे, असे आवाहन केले. राजेश लाड यांनी कर्जत तालुक्‍यात खासदारांनी कोणती कामे केली ते सांगावे, असे आव्हान दिले. शेकापचे तालुका चिटणीस प्रवीण पाटील यांनी कर्जत तालुक्‍यातील खांडस-कळंब-आंबिवली पट्ट्यातील जमिनी यांना पश्‍चिम घाटामध्ये समाविष्ट करून येथील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण केला आहे. या प्रश्‍नावर पार्थ  यांनी न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Tribal Rights Parth Pawar Politics