Loksabha 2019 : घरोघरी पोचविणार स्लिप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

शहर लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना त्यांचे मतदान केंद्र कोठे आहे आणि मतदार यादीतील त्यांचा क्रमांक काय आहे, याची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. भाजप व काँग्रेसकडून १५ एप्रिलपासून घरोघरी जाऊन मतदानाच्या स्लिप देण्यात येणार आहेत.

पुणे - शहर लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना त्यांचे मतदान केंद्र कोठे आहे आणि मतदार यादीतील त्यांचा क्रमांक काय आहे, याची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. भाजप व काँग्रेसकडून १५ एप्रिलपासून घरोघरी जाऊन मतदानाच्या स्लिप देण्यात येणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी शहरात १ हजार ९४४ बूथ आहेत. प्रत्येक बूथमध्ये सुमारे ८०० ते १४०० मतदार आहेत. शहरात सुमारे २१ लाख मतदार झाले आहेत. २३ एप्रिलला मतदान आहे. त्यामुळे मतदारांना घरोघरी जाऊन स्लिप वाटण्यात येणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांना सुमारे ५ लाख कुटुंबांपर्यंत पोचावे लागणार आहे. मतदारांपर्यंत स्लिप पोचविण्यासाठी भाजपने बूथनुसार रचना केली आहे. प्रत्येक बूथसाठी १० ते ३० कार्यकर्ते नियुक्त केले आहेत. हे कार्यकर्ते घरोघरी जाऊन स्लिप पोचवतील. त्यासाठी अद्ययावत मतदार याद्या आणि ॲपची मदत घेतली जात आहे, असे भाजपकडून सांगण्यात आले. मतदारांना स्लिप पोचविण्यासाठी शहरात विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका सुरू आहेत. त्या १४ एप्रिपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून स्लिपवाटपाचे काम पूर्ण होईल, असेही पक्षाने स्पष्ट केले.

काँग्रेसनेही स्लिपवाटप करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचीही मदत घेण्यात आली आहे, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले. काँग्रेसने प्रत्येक बूथनुसार नियोजन केले आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय रचना केली आहे. प्रत्येक बूथसाठी समिती नियुक्त केली आहे. त्या त्या बूथला अध्यक्ष नियुक्त केले आहेत. त्याशिवाय एका पोलिंग एजंटचाही त्यात समावेश असेल. त्यांच्याशिवाय त्या समितीमध्ये सुमारे १५ कार्यकर्ते आहेत. एका बूथ समितीला सुमारे ३०० घरांपर्यंत पोचायचे आहे. १५ कार्यकर्ते ३०० घरांपर्यंत दोन दिवसांत पोचू शकतील, असेही पक्षाकडून सांगण्यात आले. स्लिप पोचविण्यासाठी त्या त्या भागातील मतदारसंघ, तेथील मतदार याद्या यांचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच ॲप, ऑनलाइन याद्या यांचीही त्यासाठी मदत घेतली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

स्लिपवाटपासाठी पक्षाने नेटके आणि सूक्ष्म नियोजन केले आहे. प्रत्येक बूथसाठी १५ ते ३० कार्यकर्ते नियुक्त केले आहेत. त्या त्या भागातील सोसायट्या, वस्ती विभाग यांचा विचार करून स्लिपवाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. पक्षाचे बारकाईने नियोजन केले आहे.
- योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजप

शहरातील प्रत्येक बूथपर्यंत पोचण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बूथ समिती तयार केली आहे. त्यासाठीचे नियोजन पूर्ण झाले आहे. याबाबत विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा सुरू आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना बूथ समितीमार्फत सूचना आणि प्रशिक्षण दिले आहे.
- सचिन आडेकर, शहर बूथ समन्वयक, काँग्रेस

Web Title: Loksabha Election 2019 Voting Slip BJP Congress Home Politics